बसच्या मागणीसाठी विद्यार्थिनींची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 02:47 PM2024-09-12T14:47:17+5:302024-09-12T14:48:26+5:30
सालेकसा-साखरीटोला-कुलपा मार्गे-आमगाव बस बंद : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सालेकसा-आमगाव राज्य महामार्गावर बससेवा बंद झाल्यामुळे शाळा महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनींची अडचण झाली आहे. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी बुधवारी (दि.११) गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन पर्यायी व्यवस्था म्हणून कुलपा मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी केली.
आमगाव-सालेकसा राज्य महामार्गावरील वाघ नदीवरील पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे जड वाहनांना पुलावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. अवजड वाहनांची वाहतूक थांबविण्यासाठी पुलावर सुमारे ८ फूट उंच बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंनी आमगाव सालेकसा मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद केली आहे.
त्यामुळे रोंढा, पानगाव, मुंडीपार, गोवारीटोला कावरबांध, झालिया परिसरातून सामान्यतः राज्य परिवहन बसने प्रवास करणाऱ्या शेकडो विद्यार्थी, महिला व प्रवाशांना आमगाव व सालेकसाकडे जाणाऱ्या बससेवेपासून वंचित राहावे लागत आहे. बसमध्ये मिळणाऱ्या अर्ध्या तिकिटाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. तर विद्यार्थिनींना सालेकसा-तिरखेडी-सातगाव- साखरीटोला या मार्गावरून जाण्यासाठी प्रवाशांना १६ किमीचा प्रवास करावा फेरा मारून जावे लागत आहे.
तर बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सालेकसा साखरीटोला-कुलपा-आमगाव या मार्गावर बस तातडीने सुरू करण्याची मागणी आगारप्रमुखांनीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दोन दिवसांत बससेवा सुरू न केल्यास तीव्र आंदोलन
आ. कुरहि यांनी बालघाट जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून गोंदिया जिल्हाधि- काऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे; परंतु अजून आदेश देण्यात आले नाहीत. अखेर त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी जि.प. सदस्य छाया नागपुरे यांच्यासोबत जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना निवेदन देऊन दोन दिवसांत सालेकसा-सा- खरीटोला-कुलपा-आमगाव मार्गावरून बस सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
लोकप्रतिनिधींनी केला पाठपुरावा
सालेकसा-साखरीटोला-कुलपा या मार्गावर बस सुरू करण्यासं- दर्भात माजी आ. भेरसिंह नागपुरे यांनी मध्य प्रदेश राज्याला आमगाव मार्गावरून बस चालविण्यास परवानगी देण्याचे पत्र दिले आहे. पं.स.सदस्या अर्चना मडावी यांनी लांजीचे आ. राजकुमार कुरहि यांना प्रत्यक्ष भेटून समस्या लक्षात आणून दिली. जि.प. सदस्या छाया नागपुरे यांनीसुद्धा फोन लावून बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.