शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:15 AM2019-01-10T01:15:24+5:302019-01-10T01:15:52+5:30
तालुक्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून ओळखली जाणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.९) सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून ओळखली जाणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.९) सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान विद्यार्थ्यांनी काढलेल्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने शिक्षकाची त्वरीत नियुक्ती केली. विशेष म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढल्याची जिल्ह्यातील ही कदाचित पहिलीच वेळ असावी.
एकीकडे शासन शैक्षणिक सुधार करण्याच्या देखावा करीत आहे. प्रत्येक मुल शाळेत गेले पाहिजे या दिशेने पाऊल उचलण्याचे काम करीत असल्याचे सांगत जि.प.शिक्षण विभागाचे अधिकारी स्वत:ची पाठ थोपाटूृन घेत आहे. मात्र दुसरीकडे शाळेत नियमित शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वांरवार शिक्षकाची मागणी करुन सुध्दा शिक्षकाची नियुक्ती न केल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक आणि गावकºयांच्या उपस्थितीत बुधवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. त्यांचा हा आक्रोश पाहता जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले यांना पाचारण करण्यात आले होते. अंबुले यांनी विद्यार्थी व पालकांच्या मागणीची दखल घेत गुरूवारी (दि.१०) शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश काढले. तसेच शिक्षकाच्या नियुक्तीचे आदेश सुध्दा लगेच काढण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडी या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण १९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यानुसार शाळेत एकूण नऊ शिक्षकांची गरज आहे. परंतु सध्या या शाळेत केवळ पाच शिक्षक कार्यरत आहेत.
त्यामुळे दररोज शिक्षकाअभावी इयत्ता तिसरी व चौथ्या वर्गाची तासीका होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही शाळा एक उपक्रमशील शाळा असून या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक विविध नवोपक्रम राबवित असतात.
परंतु शिक्षक संख्या कमी असल्याने बरेचदा त्यांची अडचण होते. मागील अनेक दिवसांपासून गावकरी शिक्षकाची व्यवस्था करुन देण्याची मागणी करीत होते. त्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकण्याचा सुध्दा इशारा दिला होता. परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे बुधवारी (दि.९) विद्यार्थी व पालकांनी थेट पंचायत समितीवर धडक दिली. याप्रकरणाची दखल घेत जि.प.सदस्य व माजी समाज कल्याण सभापती देवराज वडगाये यांनी जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले व शिक्षणाधिकारी यांच्याशी दृूरध्वनीकरुन संपर्क साधला. त्यानंतर ते सालकसा पंचायत समितीत दाखल झाले. त्यानंतर राधेश्याम टेकाम या शिक्षकाला बोदलबोडी शाळेत पाठविण्याचे आदेश दिले.