विद्यार्थ्यांना मिळणार श्रेणी ऐवजी वर्गोन्नतीचा शेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:31 AM2021-05-06T04:31:00+5:302021-05-06T04:31:00+5:30
केशोरी : कोरोना संसर्गामुळे यंदा पहिली ते दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळेच आता इयत्ता चौथीच्या ...
केशोरी : कोरोना संसर्गामुळे यंदा पहिली ते दहावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळेच आता इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी ऐवजी वर्गोन्नतीचा शेरा देण्याच्या सूृचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.
गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गाच्या महामारीने अध्यापनाचे कार्य विस्कळीत होऊन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. शासनाने यावर उपाय म्हणून ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून थोडीफार शैक्षणिक कार्ये आटोपण्याचा प्रयत्न केला. परंतु या ऑनलाईन प्रक्रियेचा केवळ शहरी भागातील विद्यार्थ्यांना लाभ झाला. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रणालीपासून वंचित राहिले. प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिकवायचे कसे, याचा तिढा सुटेपर्यंत २०२०-२०२१ हे शैक्षणिक वर्षे संपले. विद्यार्थी वर्गावर शाळेत न जाताच पास झाले असून पहिली ते चवथीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आरटीई कायद्यातील कलम १६ नुसार पहिल्यांदाच श्रेणी ऐवजी वर्गोन्नत असा उल्लेख करुन विकास घोषित करण्याच्या मार्गदर्शक सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. मागील एक वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे संकट आले असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पहिली ते चवथीपर्यंतचे वर्ग वर्षभर एकही दिवस भरले नाही. जानेवारी २०२१ ला पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले होते. परंतु कोरोनाचे संकट अधिकच गडद होऊ लागल्याने काही दिवसातच शासनाने वर्ग बंद केले. त्यामुळे पुढील वर्गात प्रवेश द्यायचा कसा, असा प्रश्न निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रकात नेमके काय नमूद करावे, असा संभ्रम निर्माण झाला होता.
...
आरटीईच्या कलम १६ चा आधार
आरटीई कायद्यानुसार कलम १६ अन्वये वर्गोन्नत करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यापूर्वी दरवर्षी प्रगतिपत्रकात विविध बाबींची नोंद करुन देण्यात येत होती. यामध्ये प्रत्येक विषयानुसार मूल्यमापन, शाळेतील उपस्थित दिवस, विद्यार्थ्यांचे वजन, उंची, कार्यानुभव, कला इत्यादी विषयांचे गुण दर्शविण्याची प्रचलित पद्धत होती. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू न झाल्यामुळे कोरोनाच्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव अंतर्गत शासनाने आरटीई कायद्याच्या कलम १६ नुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्षात वर्गोन्नत करण्याचे आदेश दिले आहेत.