विद्यार्थ्यांनो तुमच्या यशात तुमचाच वाटा असतो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:21 AM2021-07-18T04:21:29+5:302021-07-18T04:21:29+5:30
अर्जुनी-मोरगाव : मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती व अथक परिश्रमामुळे यश प्राप्त होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळणे हा ...
अर्जुनी-मोरगाव : मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती व अथक परिश्रमामुळे यश प्राप्त होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळणे हा एक सुखद अनुभव असतो. मानवी जीवन यशापयश व सुखदुःखांची गुंतागुंत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ शकली नाही. परंतु शालेय शिक्षण मंडळाच्या निर्देशानुसार लावलेला हा निकाल खऱ्या अर्थाने वास्तव आहे. निकालाचा खरा आनंद आई-वडील व शिक्षकांना होत असतो. मात्र विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश त्यांच्या परिश्रमाचे फलित आहे. त्यामुळे त्यांच्या यशात त्यांचाच वाटा आहे, असे प्रतिपादिन प्राचार्य अनिल मंत्री यांनी केले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जीएमबी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीणा नानोटी, शाळेच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, जीएमबी विद्यालयाचे पर्यवेक्षक मुकेश शेंडे, प्रा. यादव बुरडे, संजय बंगळे, राजेंद्र काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते देवी सरस्वतीच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. सरस्वती विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेला १६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात, प्रावीण्य श्रेणीत ४५, प्रथम श्रेणीत ७१, द्वितीय श्रेणीत ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण १२ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन केले आहेत व आपल्या निकालाची ऐतिहासिक परंपरा कायम ठेवली आहे.
९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मीनल राऊत हिने ९७, गौरी राठोड हिने ९६.२०, स्नेहा पालीवाल हिने ९६.२०, रुची कापगते हिेने ९४.२०, शरयू गजापुरे हिने ९३.४०, श्रेया लांजेवार हिने ९३.२०, दिशा नाकाडे हिने ९३, युरागी झोडे हिने ९३, जयेश कापगते याने ९१, हर्षदा लोगडे हिने ९०.८०, संदेश हांडगे याने ९०.४०, धीरज चुटे याने ९०.४० टक्के गुण घेतले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांचा प्राचार्य मंत्री, प्राचार्य नानोटी व पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य नानोटी यांनी केले. संचालन करून आभार अर्चना गुरनुले यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.