अध्ययनस्तर निश्चितीत जिल्हा राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 08:41 PM2018-06-17T20:41:45+5:302018-06-17T20:41:45+5:30
विद्यार्थ्यांना अक्षर ज्ञान, अक्षर ओळख, वाचन, आदर्श वाचन, समजपूर्वक वाचन, गणीतात अंक ज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करता येते. डायट व शिक्षण विभागाने मागील चार महिन्यांत जिल्हाभरातील ९६४ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर वाचविण्यासाठी मेहनत घेतली.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांना अक्षर ज्ञान, अक्षर ओळख, वाचन, आदर्श वाचन, समजपूर्वक वाचन, गणीतात अंक ज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करता येते. डायट व शिक्षण विभागाने मागील चार महिन्यांत जिल्हाभरातील ९६४ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर वाचविण्यासाठी मेहनत घेतली. याची फलश्रृती वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्यावरून ९७ टक्के तर भागाकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४० टक्यावरून ८८ टक्यावर गेली आहे. अध्ययनस्तर निश्चितमध्ये गोंदिया जिल्ह्याची प्रगती राज्याच्या अव्वलस्थानी आहे.
गोंदिया जिल्ह्याने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी जिल्हा शैक्षणीक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेचे प्राचार्य राजकुमार हिवारे यांनी प्रत्येक शाळेला अधिकाºयांनी भेट देण्याची संकल्पना घालून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जलद शैक्षणीक महाराष्ट्रात शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बालरक्षक संकल्पना पुढे आणली. बालकांच्या समस्या समजून उपाययोजना करणे, बालकांच्या मुलभूत क्षमता प्रभूत्व पातळीपर्यंत विकसीत करण्यास मानवीय दृष्टीकोणातून शिक्षण देणारे, झपाटून काम करणाऱ्या शासन व्यवस्थेतील व्यक्तीला बालरक्षक म्हणून नाव देण्यात आले. जिल्ह्यात सध्या १३२ बालरक्षक शिक्षक आहेत.
जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देतांना एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन आनंद दिवस म्हणून साजरी करण्यात आली. त्या दिवशी जिल्ह्यातील १६१७ शाळांमधील २ लाख ३६ हजार २७९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गुढीपाडव्याच्या दिवशी ८ हजार २३६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी जिल्ह्यातील १०६९ शाळांपैकी ५८० शाळांमध्ये लोकसहभागातून वाचन कुटी तयार करण्यात आली. १०६९ शाळांमध्ये लोकसहभागातून ज्ञानरचनावादी तळफळे तयार करण्यात आले. १०० टक्के शाळा डिजीटल करण्यात जिल्हा राज्यात दुसºया स्थानावर आहे.
शाळेतील मुले कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शारीरीक व मानसिक शोषणाचे बळी ठरणार नाहीत यासाठी जिव्हाळा बालसंरक्षण धोरण घडीपत्रिका १५०० शाळांना वाटप करण्यात आली. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीची जाणीव जागृती करण्यासाठी जिल्ह्यातील ३३८२ मुलींना तसेच ३०० महिला कर्मचाऱ्यांना पॅडमॅन चित्रपट सिनेमागृहात दाखविण्यात आला. सेनेटरी नॅपकीन मापक दरात शासनाकडून घेतली आहे. जिल्ह्यातील ११ ते १९ वर्ष वयोगटातील १५ हजार १९७ किशोरवयीन मुलींना अस्मीता कार्ड नोंदणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या ३९ शाळांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुरूवात करण्यात आली आहे. २५ टक्के प्रवेश करविण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे.
अध्ययनस्तर निश्चीतमध्येही गोंदिया जिल्ह्याची प्रगती राज्याच्या अव्वलस्थानी आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी गोरेगाव येथील शहिद जान्या-तिम्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेत ओजस आंतरराष्ट्रीय शाळा सन २०१८-१९ पासून सुरूवात करण्यात आली. त्यामध्ये २५ विद्यार्थ्यांना नर्सरी ते केजी-२ चे शिक्षण दिले जाणार आहे. नागपूर विभागातील केवळ दुसरी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. २२० दिव्यांग मुलामुलींना स्वयंरोजगार करण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण उन्हाळी शिबिरातून देण्यात आले.
पहिल्या दिवशी १०० टक्के शाळा भेटीचे नियोजन
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षण विभाग व सातत्यपूर्ण बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाचे नाव पटावर नोंदवणे, शाळा सुरू होण्याच्या पूर्वदिनी २५ जून रोजी व शाळेचा पहिला दिवस २६ जून रोजी विविध उपक्रम घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी गटशिक्षणाधिकारी तालुक्यातील १०० टक्के शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर या महत्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात शिक्षण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या इतर विभागातील वर्ग २ व त्यावरील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. सदर अधिकारी तालुक्यातील किमान २ ते ३ शाळांना भेटी देणार आहेत.
उत्साहात होणार नवागतांचे स्वागत
शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेत नव्याने प्रवेशित होणाºया बालकांच्या घरी भेट देणे, पदयात्रा, शाळा परिसर स्वच्छता, सुशोभीकरण, पहिल्याच दिवशी फेरी काढून नवागतांचे स्वागत, विद्यार्थ्यांना नविन कोऱ्या करकरीत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. पहिल्याच दिवशी सर्व बालके गणवेशात येतील. मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ दिला जाणार आहे. नव्याने प्रवेशित होणाऱ्या भरतीस पात्र विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या सुसज्ज शाळांमध्ये उत्साहीत शैक्षणिक वातावरणाची निर्मीती करण्यात येणार आहे.
सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, विषयसाधन व्यक्ती, विषय सहाय्यक यांनी जानेवारी ते ३० एप्रिल २०१८ पर्यंत नियोजनाप्रमाणे मेहनत घेऊन भागाकार व आदर्श प्रगट वाचनात जिल्ह्याला राज्याच्या अव्वलस्थानी नेले. त्याचे श्रेय माझ्या शिक्षक बांधवाना जाते. मी नियोजन केले, अमंलबजावणी शिक्षकांची आहे.
-राजकुमार हिवारे,
प्राचार्य जिल्हा शैक्षणीक सातत्यपूर्ण
व्यावसायीक विकास संस्था, गोंदिया.
.....................................................
चार महिन्यात शिक्षकांनी केलेल्या मेहनतीमुळे अध्ययन स्तर निश्चीतीत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वलस्थानी आहे. दिवाळीपर्यंत गोंदिया जिल्हा नॅशनल अॅचिवमेंट सर्वेची १०० टक्के पातळी गाठेल.
-उल्हास नरड
प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.