मोटारसायकलस्वार तरुणांची स्टंटबाजी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:48+5:302021-04-13T04:27:48+5:30
केशोरी : विनापरवानाधारक तरुण मंडळी वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवित नेहमी केशोरी- गोठणगाव या रस्त्याने सायंकाळच्या वेळी सुसाट वेगाने ...
केशोरी : विनापरवानाधारक तरुण मंडळी वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवित नेहमी केशोरी- गोठणगाव या रस्त्याने सायंकाळच्या वेळी सुसाट वेगाने हात सोडून गाडी चालविण्याची स्टंटबाजी करताना दिसून येत आहेत. गाडीला एलईडी लाईट लावणे, कर्णकर्कश आवाज काढणारे हाॅर्न मोठ्याने वाजविणे, वळण रस्त्यावरून गाडी वाकवून चालविणे या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. यामुळे सायंकाळी या रस्त्याने फिरणाऱ्या जेष्ठ नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
सध्या तरुणांमध्ये हात सोडून सुसाट वेगाने मोटारसायकल चालविणे, अतिचमकदार लाईट लावणे, मोठ्याने हार्न वाजविणे इत्यादी जीवघेणी क्रेझ निर्माण झाल्याचे दिसून येते. केशोरी-गोठणगाव या जिल्हा मार्गावर नेहमी सायंकाळी वाहनांची वर्दळ असते व यावेळी काही तरुण मंडळी अशी स्टंटबाजी करीत असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे या रस्त्याने पायदळ किंवा सायकलने जाणाऱ्या लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर कोण आळा घालेल असा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या या तरुण स्टंटबाज मंडळीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे ते निर्ढावले आहेत. यामुळे आज सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्टंटबाजीच्या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.