धान खरेदीत घोळ प्रकरणी उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 09:26 PM2022-10-06T21:26:16+5:302022-10-06T21:28:20+5:30
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाद्वारे हमीभावाने धान खरेदी केली जाते. यासाठी हे विभाग धान खरेदी केंद्राला मंजुरी देऊन त्यांच्याकडून शेतकऱ्याचा धान खरेदी केला जातो. यंदा रब्बी हंगामात या दोन्ही विभागांच्या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात नियमितता आढळली. याची चौकशीदेखील या दोन्ही विभागांनी स्वतंत्रपणे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी व भरडाईमध्ये घोळ केल्याप्रकरणी देवरी येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकाने दीपक सिंगला यांनी निलंबित केले आहे. यासंबंधीचे पत्रदेखील ३० सप्टेंबरला काढले आहे.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाद्वारे हमीभावाने धान खरेदी केली जाते. यासाठी हे विभाग धान खरेदी केंद्राला मंजुरी देऊन त्यांच्याकडून शेतकऱ्याचा धान खरेदी केला जातो.
यंदा रब्बी हंगामात या दोन्ही विभागांच्या धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात नियमितता आढळली. याची चौकशीदेखील या दोन्ही विभागांनी स्वतंत्रपणे केली. यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ३८ धान खरेदी केंद्रांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला आहे.
आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय देवरीकडून हंगाम २०२०-२१मध्ये खरेदी केंद्र आलेवाडा व हंगाम २०२१-२२ मध्ये खरेदी केंद्र गोरे यांना धान खरेदीचा अधिकार देण्यात आले होते. मात्र दोन्ही केद्रांनी केवळ कागदावर खरेदी दाखवत शासनाच्या २ कोटी ७२ लाख रुपयांचा घोळ केल्याचे चौकशी अधिकाऱ्यांने केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.
तब्बल १३ हजार क्विंटल धानाची तफावत
खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये देवरी तालुक्यातील आलेवाडा धान खरेदी केंद्र येथे ९० लाख ५५ हजार ७८४ रुपयांचा ४ हजार ८४७.८५ क्विंटल धानाचा साठा, तर हंगाम २०२१-२२ मध्ये खरेदी केंद्र गोरे येथे १ कोटी ८२ लाख ८ हजार २९७ रुपयांच्या ९ हजार ३८५.७२ धानाचा साठा असा दोन्ही केंद्रांवर एकूण २ कोटी ७२ लाख ६४ हजार ८१ रुपयांच्या धानाचा घोळ केला.
मुळेवार यांनी चौकशी अधिकाऱ्यावर टाकला दबाव
- गोरे आणि आलेवाडा येथील याप्रकराची तक्रार झाल्यावर व्यवस्थापकीय संचालक यांच्याद्वारे झालेल्या चौकशीत अधिकारी आशिष मुळेवार यांनी धान साठा शिल्लक नसणाऱ्या संस्थेवर कारवाई न करणे, अपहार करणे, तसेच चौकशी अधिकाऱ्यांवर दबाब टाकणे आणि शासनाचे नुकसान आदी बाबी सिद्ध झाल्या. त्यामुळे व्यवस्थापकीय संचालकाने त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई केली.
केंद्रावरील धानाचा साठाच केला गायब
- प्रादेशिक व्यवस्थापन भंडारा यानी यांनी दोन्ही गोरे व आलेवाडा या दोन्ही केंद्रावरील धानाच्या भरडाईसाठी राइस मिलर्सला यांना डिओ दिले, पण जेव्हा राइस मिलर्स या दोन्ही केंद्रावर धानाची उचल करण्यासाठी गेले तेव्हा या दोन्ही केंद्रावर खरेदी केलेला धानच आढळला नाही. त्यानंतर यातील घोळ उघडकीस आला.
सहकार्य करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई
विशेष म्हणजे त्यांच्या या कामात मदत करणाऱ्या त्यांच्यासह तत्कालीन विपणन निरीक्षक एम. एस. इंगले, प्रतवारीकार व विपणन निरीक्षक सी. डी. जुगनाके या तिघांवर फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात धान खरेदी घोटाळ्यात एका वर्ग १च्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
आणखी मोठे मासे लागणार गळाला
आदिवासी विकास महामंडळांतर्गत करण्यात आलेल्या धान खरेदीतील अनियमितता पुढे आल्यानंतर आणि थेट उपप्रादेशिक व्यवस्थापकावर कारवाई झाल्याने काही कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, याप्रकरणी आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.