आठ हजारांची लाच भोवली; दुय्यम निबंधक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 12:25 PM2023-09-01T12:25:07+5:302023-09-01T12:26:51+5:30
शेतीच्या रजिस्ट्रीसाठी मागितले पैसे : सालेकसा येथील कार्यालयातून घेतले ताब्यात
गोंदिया : शेतजमिनीची रजिस्ट्री करून देण्यासाठी शेतकऱ्याला आठ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या प्रभारी दुय्यम निबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सालेकसा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गुरुवारी (दि. ३१) ही कारवाई करण्यात आली. मधुकर लोकनाथ मेश्राम (५०, रा. गोंदिया) असे लाचखोर प्रभारी दुय्यम निबंधकाचे नाव आहे.
तक्रारदार (४२, रा. सोनारटोला- गिरोला, सालेकसा) हे शेतकरी असून त्यांनी खरेदी केलेली मौजा धानोली येथील १६ आर शेतजमिनीची ‘क’ प्रत जुनी आहे. तसेच जमिनीची रजिस्ट्री होणार नाही, असे सांगून आरोपी मधुकर मेश्राम त्यांच्याकडे आठ हजार रुपयांची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या आधारे पथकाने सोमवारी पडताळणी केली असता मधुकर मेश्राम याने पंचांसमक्ष रजिस्ट्री करून दिल्यानंतर मोबदला म्हणून आठ हजार रुपयांची मागणी केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि. ३१) मधुकर मेश्राम याला कार्यालयातून ताब्यात घेतले.
प्रकरणी आरोपीविरुद्ध सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे, चालक दीपक बाटबर्वे यांनी केली आहे.