प्रकरण लपविण्याचा गुन्हा दाखल करा
By admin | Published: September 15, 2016 12:29 AM2016-09-15T00:29:51+5:302016-09-15T00:29:51+5:30
तिरोडा तालुक्याच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोंगरी येथे सातवीच्या वर्गशिक्षकाच्या पाण्याच्या बाटलीमध्ये आणि मुलाच्या जेवण्याच्या डब्यात
रासायनिक खत प्रकरण : पालडोंगरी शाळेतील मुख्याध्यापकावर आरोप
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पालडोंगरी येथे सातवीच्या वर्गशिक्षकाच्या पाण्याच्या बाटलीमध्ये आणि मुलाच्या जेवण्याच्या डब्यात रासायनिक खत मिळाल्याची पुष्टी मुख्याध्यापक, शिक्षक, गट शिक्षणाधिकारी यांच्या समक्ष झाली. मात्र तेथील मुख्याध्यापक पी.के. पटले यांनी सदर प्रकरण स्वत:चा विभाग व पोलिसांपासून लपविली. त्यामुळे त्यांच्यावर प्रकरण लपविण्याचा गुन्हा दाखल व्हावा, असा सूर ग्रामस्थांमध्ये आहे.
जातीवाद व शिक्षकाला फसविण्यासाठी यात मुख्याध्यापकाचे षडयंत्र असल्याची चर्चा आहे. एक शिक्षक व लहानशा विद्यार्थ्याच्या जीवनाशी निगडीत प्रकरण मुख्याध्यापकाने का लपवले, हे शिक्षण विभाग व पोलिसांनी गांभीर्याने समजून घेणे गरजेचे आहे. ज्या शिक्षकाच्या पाण्याच्या बाटलीत रासायनिक खत आढळले त्यांचे नाव दिलीप हिरापुरे व ज्याच्या डब्यात खत दिसले त्या विद्यार्थ्याचे नाव टिकेश्वर इंद्रराज मानकर असे आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी मुख्याध्यापक पी.के. पटले शाळा सोडून बाहेर गेले होते. शेवटी ते कशासाठी व कुठे गेले होते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अशी घटना जिल्ह्यातील पहिलीच घटना असून मुख्याध्यापक पटले यांनी ही बाब गांभीर्याने का घेतली नाही.
शिक्षकाचा घात झाला असता तर इतर शिक्षकांवरही खापर फुटले असते. विद्यार्थ्याचा घात झाला असता तर वर्गशिक्षकाला जबाबदार धरण्यात आले असते. त्यामुळे शिक्षक दिलीप हिरापुरे हे शिक्षक किंवा नागरिकांपैकी कुणाचे टार्गेट तर नव्हते, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मुख्याध्यापक पी.के. पटले हे या प्रकरणात दोषी असल्याचे अनेकांचे मत आहे. तसे पीडित शिक्षकांनी लेखी दिले. सर्व शिक्षकांनीही लेख पत्र देवून कळविले. परंतु मुख्याध्यापक पी.के. पटले यांनी विभागाला माहिती न देता विभागाशी बेईमानीच केली.
गुन्हेगारी स्वरूपाची घटना असताना पोलिसांना तक्रार देण्यात आली नाही. मुख्याध्यापक पटले यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला. त्यामुळे ते पदाच्या योग्य आहेत काय, हे शिक्षण विभागाने समजून घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)