भाजीपाला पिकांच्या रोप उत्पादनासाठी मिळणार अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 02:15 PM2021-01-19T14:15:20+5:302021-01-19T14:16:35+5:30
Gondia News गोंदिया जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यात येणार असून, या योजनेतून भाजीपाला पिकाची दर्जेदार रोपे उत्पादन करण्यासाठी विविध बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यात येणार असून, या योजनेतून भाजीपाला पिकाची दर्जेदार रोपे उत्पादन करण्यासाठी विविध बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
यासाठी लाभार्थीकडे किमान १ एकर जमीन आणि रोपवाटिकेसाठी पाण्याची सुविधा असावी. योजनेमधून टोमॅटो, वांगी, कोबी, मिरची, कांदा इत्यादी भाजीपाल्याची रोपवाटिका उभारणी करण्यासाठी शेडनेटगृह, प्लास्टीक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर आणि प्लास्टीक क्रेट्स या बाबींसाठी २.३० लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. या चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक आहे. या योजनेतून महिला कृषी पदवीधर, महिला गट, महिला शेतकरी, भाजीपाला उत्पादक, अल्प व अत्यल्प भूधारक आणि शेतकरी गट यांना प्राधान्य राहील. योजनेतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना तालुक्याच्या लक्षांकानुसार अनुदान देण्यात येणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी, तसेच अर्ज करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधता येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.