शालेय पोषण आहाराच्या धान्यात कचरा, सिमेंट, गोटे अन् गुटखा; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 10:48 AM2022-03-16T10:48:29+5:302022-03-16T11:07:46+5:30
शाळांना निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा करणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप जि.प. सदस्य नेहा तुरकर यांनी केला आहे.
गोंदिया : जिल्ह्यातील वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात आलेल्या शालेय पोषण आहार(Mid Day Meal) धान्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याचे पाऊच आढळल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात तक्रार करूनही कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचे चंगेरा येथील उपसरपंच नजमा मुजीक खान यांनी सांगितले.
या प्रकरणाची तक्रार खा. प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, जि.प. सदस्य नेहा तुरकर यांना करण्यात आली. याचीच दखल नेहा केतन तुरकर यांनी मंगळवारी शाळेला भेट देत शालेय पोषण आहाराची पाहणी केली. पोषण आहार अधीक्षकांना शाळेत पाचारण करून शाळेत आलेल्या सर्व शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याचा पंचनामा केला.
गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंगेरा येथे ७ मार्च रोजी शालेय पोषण आहार कंत्राटदार हरी राइस ॲन्ड ॲग्रो लिमिटेड, महालक्ष्मी राइस मिलजवळ, गोविंदपूर रोड, गोंदिया यांच्याकडून ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ अशा १५४ दिवसांचे शालेय पोषण आहाराचा धान्य पुरवठा करण्यात आला. त्या पोषण आहाराची पाहणी १० मार्च रोजी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी उपसरपंच नजमा मुजीक खान यांच्या उपस्थितीत केली. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा, धूळ, सिमेंट व गुटख्याचे पाऊच आढळून आले. त्यानंतर उपसरपंच नजमा खान यांनी १० मार्च रोजी याची तक्रार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली. मात्र, कोणतीच कारवाई झाली नाही.
त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य नेहा केतन तुरकर यांनी मंगळवारी (दि.१५) जि. प. शाळा चंगेरा येथे पोहोचून पोषण आहाराची पाहणी केली. भ्रमणध्वनीवरून पोषण आहार पुरवठा अधीक्षक रहांगडाले यांना शाळेत पाचारण केले. रहांगडाले यांनी शाळेत पोहोचून पाहणी करून निकृष्ट धान्याचा पंचनामा केला. एक चुंगडी हरभरा व मूग डाळ निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले.
हा तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ
शाळांना निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा पुरवठा करणे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याचा आरोप जि.प. सदस्य नेहा तुरकर यांनी केला आहे. पोषण आहाराचा पंचनामा करताना बिर्सोलाचे पंचायत समिती सदस्य, बनाथरचे केंद्रप्रमुख, शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मार्च एण्डिंगच्या नावावर शालेय कंत्राटदार विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.