सुशिकलाच्या यशाने राज्याचे नाव झाले
By admin | Published: February 21, 2017 01:00 AM2017-02-21T01:00:35+5:302017-02-21T01:00:35+5:30
एशियन चॅम्पीयनशिप सायकलिंग स्पर्धेत सुशिकला आगासेच्या रुपाने राज्याला पहिले कास्य पदक मिळाले.
निशीकांत इलमे : करडी येथे सुशिकला व प्रशिक्षक बुद्धे यांचा सत्कार
करडी (पालोरा) : एशियन चॅम्पीयनशिप सायकलिंग स्पर्धेत सुशिकला आगासेच्या रुपाने राज्याला पहिले कास्य पदक मिळाले. राज्याला आतापर्यंत या स्पर्धेत एकही पदक मिळालेले नव्हते. भारताला तीन वर्षानंतर पदक मिळाले आहे. यावरून सुशिकलाची कामगिरी लक्षात येते. यानंतर जुलै २०१७ मध्ये ती ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पीयन स्पर्धा चायना मध्ये खेळणार आहे. त्यानंतर एशियन कप स्पर्धेत दिल्ली, थायलंड व तायवान येथेही नशिब आजमावणार आहे. सध्या तिला आशियाई रँकमध्ये दुसरे स्थान आहे. ती देशाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. सुशिकलामुळे महाराष्ट्राचे नाव झाले, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निशीकांत इलमे यांनी व्यक्त केले.
करडी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे वतीने सुशिकला आगाशे व तिचे प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांचा सत्कार शाळेचे वतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वागत सत्कार कार्यक्रमाचे मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती विलास गोबाडे होते. प्रमुख अतिथीस्थानी सरपंच सीमा साठवणे, निशिकांत इलमे, प्रशिक्षक अ. वा. बुद्धे, सायकलपटू सुशिकला आगाशे, करडीचे ठाणेदार प्रभाकर बोरकुटे, डॉ.युवराज जमईवार, भाजपा तालुका अध्यक्ष बाबूजी ठवकर, भूमीगत स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्यामसुंदर शेंडे, प्राचार्य दयाळनाथ माळवे, अशोक शेंडे, भगवान चांदेवार, विनायक शेंडे, मंगेश साठवणे, भाष्कर गाढवे, नशिरखाँ पठाण, मोहन किरणापुरे, सुशिकलाचे वडील दुर्गाप्रसाद आगाशे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते सुशिकला व तिचे प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकातून प्राचार्य माळवे यांनी, सुशिकलामुळे शाळेला व जिल्ह्याला ओळख मिळाली. गावाचे नाव मोठे झाले. लहानशा गावातून सुशिकला प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांच्यामुळे समोर आली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात मेहनत करा, अभ्यासात जिद्द बाळगा, यश नक्कीच प्राप्त होते. यशस्वी होण्याची जिद्द ही पहिली पायरी आहे.
यावेळी बुध्दे यांनी, सुशिकलाचे प्रशिक्षन तुडका मैदानावर झाले. सुरुवातीला तिच्यातील गुणांची परीक्षा मी केली. त्यामुळे तिचे घरी जाऊन तिला प्रशिक्षणासाठी तयार करवून घेतले. सुशिकलाचे रँकींग चांगले आहे. शिष्यामुळे गुरुचा मान वाढतो. तो मान मला आज मिळाला आहे .गुरु फक्त शिष्याला दिशा दाखविण्याचे काम करतो, तर शिष्याला मेहनतीच्या व जिद्दीच्या भरवशावर आपली दशा बदलायची असते, असे प्रतिपादन केले. जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी सुद्धा गरीबीतून खेळाचे भरवशावर आपली दशा बदलविली आहे. ती रोज ८ कि.मी. अंतरावरील शाळेत धावत जायची व शाळा सुटल्यानंतर घरी धावतच परत यायची. यावेळी त्यांनी अंदमान निकोबार येथील एका खेळाडूचे उदाहरण पटवून सांगितले. संचालन शिक्षक क्षीरसागर यांनी केले. तर आभार शिक्षक आडे यांनी मानले. यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)