शेतकऱ्याच्या उपोषणाची यशस्वी सांगता
By admin | Published: February 14, 2016 01:42 AM2016-02-14T01:42:29+5:302016-02-14T01:42:29+5:30
शेतकरी मंगलमूर्ती येरणे यांच्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील धावून आले.
कृषी अधीक्षकांकडून मदत : येरणे यांना दिला ७.९१ लाखांचा धनादेश
अर्जुनी मोरगाव: शेतकरी मंगलमूर्ती येरणे यांच्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील धावून आले. त्यांनी तातडीने ७ लाख ९१ हजार रूपयांचा धनादेश येरणे यांना दिला. थकित असलेल्या ज्या रकमेसाठी येरणे यांचे ५ तारखेपासून उपोषण सुरू होते, ती रक्कम मिळताच येरणे यांनी शुक्रवारी (दि.१२) आपले उपोषण मागे घेतले.
सन २०१२-१३ मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शतकोटी वृक्ष लागवड योजनेसाठी शेतकरी येरणे (आसोला) यांनी आपल्या रोपवाटीकेतून आंबा व सागवानची सात लाख ९१ हजार ७९३ रूपये किमतीची रोपटी पुरविली होती. येरणे यांना रोपट्यांचे पैसे देण्यात यावे यासाठी रोपवाटीकाधारकांच्या मापन पुस्तकेत नोंदी घेऊन बील तालुका कार्यक्रम अधिकारी (तहसीलदार) यांच्याकडे २३ जानेवारी २०१३ रोजी कृषी विभागाकडून पाठविण्यात आले होते.
पैशांसाठी येरणे यांनी कित्येकदा कार्यालयाच्या चकरा मारल्या, मात्र मागील चार वर्षांपासून येरणे यांच्या हाती त्यांचा पैसा आला नाही. अखेर थकून असलेल्या आपल्या रकमेसाठी येरणे यांनी ५ तारखेपासून शेतातच अन्नत्याग आंदोलन सुरू केले. तसेच आत्महत्येचा इशाराही दिला होता. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी येरणे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र येरणे यांनी निर्णयावर ठाम असल्याचे सांगून त्यांना परतावून लावले.
अखेर त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी शुक्रवारी (दि.१२) दुपारी येरणे यांची भेट घेतली व त्यांच्या हातात सात लाख ९१ हजार रूपयांचा धनादेश व रोख ८०० रूपये दिले व भाकर-ठेचा चारून त्यांच्या उपोषणाची सांगता केली.
याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी तुमडाम, विजय पेशट्टीवार, मंडळ कृषी अधिकारी ऋषी चांदेवार, अविनाश हुकरे, राकेश नागपुरे, दिलीप चित्रीव, प्रकाश येरणे, गुलाब येरणे प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)