कोरोना काळात विवंचनेत असलेल्या १७० व्यक्तींची आत्महत्या; भावनिक, आर्थिक आधार देण्याची गरज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:20 AM2021-06-21T04:20:25+5:302021-06-21T04:20:25+5:30
गोंदिया : काेरोनाने जगण्याचे अनेक संदर्भच बदलले आहेत. मागील दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प ...
गोंदिया : काेरोनाने जगण्याचे अनेक संदर्भच बदलले आहेत. मागील दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प होते. परिणामी अनेकांचा रोजगार सुध्दा हिरावला गेला. तर हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे सर्वाधिक हाल झाले. रोजगार नसल्याने आणि अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने अनेकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. उद्योगधंदे ठप्प असल्याने बँकेच्या कर्जाची परतफेड कुठून करायची, या सर्व गोष्टींच्या चिंतेमुळे आलेल्या नैराश्यातून जिल्ह्यातील १७० जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. कोरोना कालावधीतच सर्वाधिक आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे.
नैराश्यात असताना संबंधित व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक आधार देण्याची गरज असते. त्याच्यातील नकारात्मक भाव नष्ट करून सकारात्मकता निर्माण करण्याची गरज असते. कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असला तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम मानवी जीवनावर झाले आहेत. अजूनही बरेचजण कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे अद्यापही सावरलेले नाही. यामुळेच आलेल्या नैराश्यापोटी अनेकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करून आपले जीवन संपविले. नैराश्यात असलेल्या व्यक्तीला वेळीच आधार देण्याची गरज आहे.
....................
कुटुंबाने काळजी घेण्याची गरज
- आर्थिक विवंचनेत असलेल्या तसेच कोरोनामुळे रोजगार हिरावलेल्यांची काळजी घेऊन त्यांना आधार देण्याची गरज आहे. सतत मानसिक तणावात राहणारे अनेकदा आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत असतात. अशांची समजूत काढून त्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यामुळे कुटुंबाने अथवा मित्रपरिवाराने त्यांच्याकडे लक्ष देत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
................
हेही दिवस जातील....
लॉकडाऊनमुळे तब्बल तीन-चार महिने उद्योगधंदे बंद होते. त्यातच कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा दोन महिने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. घरची चूल कशी पेटणार, याचीच चिंता सतावित होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. उद्योगधंद्यांची गाडी देखील रुळावर येत आहे. पुन्हा नव्याने आणि नव्या उमेदीने कार्याला सुरुवात करा, हेही दिवस जातील आणि पुढे चांगले दिवस येतील, असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे.
..................
कोट
सततच्या येणाऱ्या संकटांमुळे आणि कुटुंबीयांच्या चिंतेमुळे अनेकदा नैैराश्याची भावना निर्माण होत असते. यातून आलेल्या नैराश्यामुळे अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असतात. अशावेळी मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना कुटुंब आणि जवळच्या मित्रांनी, आर्थिक असो वा मानसिक, पण आधार देण्याची गरज असते. संकटात आपण सर्व सोबत आहोत, हे दिवस सुध्दा लवकरच जातील, चांगले दिवस येतील असे सकारात्मक विचार निर्माण करण्याची गरज आहे. नैराश्यात गेलेल्या व्यक्तीसमोर नेहमी सकारात्मकता बाळगण्याची व त्याच्या आजुबाजूचा परिसर कसा प्रसन्न राहील याची सुध्दा काळजी घ्यावी.
- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचारतज्ज्ञ गोंदिया.
.............
जिल्ह्यातील आत्महत्या...
२०१९ - ८५
२०२०-११०
जाने. ते मे - ३५
............................
कोणत्या वयोगटाचे किती
२५ वर्षापेक्षा कमी - १२
२६ ते ४० - ६५
४१ ते ६० : ८७
६१ पेक्षा जास्त : २४