प्रेयसीचा खून करून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या; तिचे लग्न दुसऱ्याशी जुळल्याने होता नाराज
By नरेश रहिले | Published: December 24, 2023 07:59 PM2023-12-24T19:59:50+5:302023-12-24T20:00:40+5:30
सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथील प्रेमभंग झालेल्या तरूणाने आपल्या प्रेयशीचा गळा आवळून खून केला.
गोंदिया : सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथील प्रेमभंग झालेल्या तरूणाने आपल्या प्रेयशीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:च त्याने पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली. श्रीकांत महादेव कापगते (२२, रा. पुराडा, ता. देवरी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याची प्रेयसी टिकेश्वरी सुकलाल मिरी (२२, रा. हलबीटोला, ता. देवरी, जि. गोंदिया) हिचा त्याने गळा आवळून खून केल्यानंतर त्याने स्वत:च गळफास घेत आत्महत्या केली.
श्रीकांतचे वडील विजय महादेव कापगते (५२, रा. पुराडा, ता. देवरी) हे २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आपल्या शेताकडे पाणी पाहायला गेले होते. दरम्यान, त्यांच्या शेताच्याच बाजूला असलेले शिवचरण गुनाजी आचले यांच्या शेतात पळसाच्या झाडाला फासावर श्रीकांत लटकलेला दिसला. श्रीकांत व टिकेश्वरी यांचे अनेक दिवसापासून प्रेमसंबध होते. या संबधातून ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असे स्वप्न रंगवित असतांना टिकेश्वरीचे लग्न दुसऱ्या तरूणासोबत जोडण्यात आले. तेव्हापासून श्रीकांत आपल्या प्रेयशीला घेऊन चिंतेत होता. ती आपली व्हावी यासाठी तिला तो विनवणी करायचा. परंतु घरच्यांच्या समोर आपण बोलू शकणार नाही असे टिकेश्वरीचे म्हणणे होते. २२ डिसेंबर रोजी श्रीकांतने टिकेश्वरीला आपल्या गावी आणले. शेताकडे एकांतवास मिळेल म्हणून त्याने तिला शेतात नेले. लग्नाचा हट्ट केला परंतु टिकेश्वरने त्याचे न ऐकल्यामुळे त्याने तिला गळा आवळून खून केला. नंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
प्रियकरावर खुनाचा गुन्हा
या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी श्रीकांत महादेव कापगते (२२, रा. पुराडा, ता. देवरी) या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
१३ दिवसात दोन प्रकरणे
लग्नाच्या बेडीत अडकण्याला घेऊन आपल्या जीववार उदार होऊन जीव देण्याची तयारी दाखविणाऱ्या दोन घटना १३ दिवसात दोन घडल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्याच्या परसोडी येथे १२ डिसेंबर रोजी दोन तरूण-तरूणीने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विषप्राशन करणारा तरूण परसोडी येथील तर तरूणी भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परसटोला येथील आहे. त्या दोघांवर उपचार केला. सुदैवाने प्राणहाणी झाली नाही. ह्या घटनेनंतर १२ दिवसानेच दुसरी घटना कानावर पडते. त्यात प्रियकराने प्रेयशीचा खून करून स्वत: आत्महत्या केली.