विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:52 PM2019-05-20T21:52:53+5:302019-05-20T21:54:13+5:30
येगाव-जानवा येथील विवाहितेने सोमवारी (दि.२०) पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास घेवून गळा दाबल्याचा मृताच्या वडीलांनी आरोप केला व जोवर संशयीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोवर उत्तरीय तपासणी झालेला मृतदेह उचलू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. काही काळपर्यंत तणाव निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : येगाव-जानवा येथील विवाहितेने सोमवारी (दि.२०) पहाटे गळफास घेवून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास घेवून गळा दाबल्याचा मृताच्या वडीलांनी आरोप केला व जोवर संशयीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोवर उत्तरीय तपासणी झालेला मृतदेह उचलू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. काही काळपर्यंत तणाव निर्माण झाला होता. मात्र तब्बल ४ तासानंतर अंत्यसंस्कारासाठी येगाव येथे मृतदेह रवाना झाला व या प्रकरणावर पडदा पडला. मृत विवाहितेचे नाव स्वाती सुखदेव वाढई असे आहे.
पळसगाव-सोनका येथील स्वाती सुखदेव वाढई हिचा प्रमोद सोनीराम भेंडारकर यांच्याशी सन २०११ मध्ये विवाह झाला. विवाहनंतर ती सासू, सासरे व पतीसोबत येगाव येथे राहायची. सोमवारी (दि.२०) पहाटे सुमारे ४.३० वाजतादरम्यान घराच्या फाट्याला नॉयलॉन दोरी लावून तिने गळफास घेतला. पहाटेच्या सुमारास प्रमोदला स्वाती पलंगावर दिसली नाही. यावर त्याने आई-वडिलांना जागे केले व स्वातीचा घरातच शोध घेतला. त्यावेळी ती घराच्या धाब्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत लोंबकळत दिसली. पतीच्या तोंडी रिपोर्टवरुन पोलिसांनी कलम जाफौ १७४ चा गुन्हा नोंदविला.
स्वातीला दोन्ही मुली झाल्याने जावई प्रमोद हा तिला नेहमी मारहाण करायचा. एक महिन्यापूर्वी प्रमोद (पती), अशोक (भासरा), शारदा (ंसासू), सोनीराम (सासरा) व वंदना भेंडारकर (जाऊ) यांनी मुलगा होत नाही म्हणून मारहाण केल्याचे स्वातीने तिच्या वडिलांना फोन करुन सांगितले होते. नंतर तिला पळसगाव येथे घेऊन आलो व गोंदियाच्या डॉक्टरकडून उपचार करुन घेतला.
१७ मे रोजी पतीचा फोन येत आहे म्हणून ती सासरी येगावला गेली. १८ मे रोजी पती त्रास देवून मारहाण करीत असल्याचा फोन आल्याने तिला घेण्यासाठी मुलाला येगावला पाठविले. मात्र मुलगी त्यांच्यासोबत आली नाही. नातनीला घेवून ते परतले. रविवारी मी गावी येत आहे असा स्वातीने आईला फोन केला होता.
स्वातीचे सासरे सोनीराम यांनी स्वातीला रविवारी अरुणनगर रेल्वे स्थानकावर सोडून दिले. रेल्वेला उशीर होता व सासऱ्याला ती वारंवार फोन करीत होती. मात्र ते प्रतिसाद देत नव्हते. रात्री ९ वाजतानंतर ते अरुणनगर रेल्वे स्थानकावर घ्यायला आले व येगावला गेले.
सोमवारी मुलींना घ्यायला पळसगावला येते असा तिने फोन केला. तेव्हा येगाव येथील आत्माराम भेंडारकर यांना फोन करुन स्वातीचे घरी जा व तिचे सासरकडील मंडळींना समजावून सांगा असे सांगितले. मात्र सोमवारी (दि.२०) सकाळी स्वातीचा मृत्यू झाल्याची बातमी आली. तिला सासरच्या मंडळींनी गळा दाबून मारले व गळफास घेवून आत्महत्या केल्याचे भासविले, अशी तक्रार स्वातीच्या वडिलांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात दिली.
सोमवारी (दि.२०) सकाळी स्वातीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. उत्तरीय तपासणी पार पडली मात्र सासरच्या मंडळींना जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी आक्रमक भूमिका स्वातीच्या वडिलांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणाव होता.
४ तासानंतर तणाव निवळला व मृतदेह येगाव येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. ही आत्महत्या की हत्या याचा उलगडा उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच होणार आहे. मात्र स्वातीचे पती व सासऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक देवीदास शेवाडे तपास करीत आहेत.
मृतदेहाजवळ मिळाली चिठ्ठी
मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत मामाजी अशू आरू यांचेकडे लक्ष द्या. तिचे वडील त्यांचेकडे लक्ष देऊ शकत नाही. माझ्या पोरीला बडे पप्पा, बडी मम्मी यांच्याकडे किंवा पळसगाव येथे शिकवा. तिचे वडील शिकवू शकत नाही, असा लिखीत संदेश आहे. ही चिठ्ठी मृत स्वातीने स्व हस्ताक्षरात लिहीली का ? याची शहानिशा होणे गरजेचे आहे.