उन्हाळ्यात १०५ हेक्टर वनक्षेत्रात वणवा

By Admin | Published: June 18, 2015 12:47 AM2015-06-18T00:47:42+5:302015-06-18T00:47:42+5:30

यावर्षी जिल्ह्यातील वनक्षेत्रात वणव्याचे प्रमाण कमी असले तरी गोंदिया वनविभागातील १०५ हेक्टर वनक्षेत्रात वणवा लागला होता.

In the summer of 105 hectares forest area | उन्हाळ्यात १०५ हेक्टर वनक्षेत्रात वणवा

उन्हाळ्यात १०५ हेक्टर वनक्षेत्रात वणवा

googlenewsNext

तीन महिन्यांत ४३ घटना : वेळीच नियंत्रणाने मोठी हानी टळली
देवानंद शहारे गोंदिया
यावर्षी जिल्ह्यातील वनक्षेत्रात वणव्याचे प्रमाण कमी असले तरी गोंदिया वनविभागातील १०५ हेक्टर वनक्षेत्रात वणवा लागला होता. संरक्षण दलाने वेळीच वणव्यावर नियंत्रण मिळविल्याने मात्र मोठी हानी टळली. केवळ पाला-पाचोळाच आगच्या विळख्यात स्वाहा झाला. तर वृक्ष व वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्यात वनविभागाने यश मिळविल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरवर्षी जंगलात वणव्याच्या घटना घडतात. यात वणव्याने उग्र रूप धारण केले तर बहुमूल्य वनसंपदा तसेच अनेक वन्यप्राणीसुद्धा आगीत होरपळले जातात. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा वनांत आग लागण्याच्या घटना कमी घडल्या. तसेच वनविभागाच्या संरक्षक दलाच्या सतर्कतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. शिवाय पाला-पाचोळाच जळल्याने फारसे नुकसान झाले नाही. तेंदूपत्ता हंगामात तेंदूपाने तोडण्यासाठी जाणारे मजूरसुद्धा वणवा लागण्यासाठी जबाबदार असतात. काही मजुरांना बिडी किंवा सिगारेट ओढण्याचा शौक असतो. या प्रकारामुळेही आग लागते. तर वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतजमिनीत शेतकऱ्यांकडून धुरे जाळले जातात. ती आग योगरित्या विझविण्यात आली नाही तर हळूहळू वनात पोहचून पेट घेते.
गोंदिया वन विभागाच्या वनक्षेत्राचे क्षेत्रफळ २५३१.१३१ चौ.किमी. आहे. यात सन २०१३ मध्ये वणवा लागण्याच्या १७२ घटना घडल्या होत्या. त्यात ६९२.९० हेक्टर वनक्षेत्रात आग लागली होती. तर सन २०१४ मध्ये ६७ घटना घडल्या होत्या. यात २३३.१० वनक्षेत्रात वणवा लागला होता. मात्र सन २०१५ मध्ये वणव्याचे प्रमाण कमी आहे.
सन २०१५ च्या तीन महिन्यात वनांत आग लागण्याच्या एकूण ४३ घटना घडल्या. यात १०५ हेक्टर वनक्षेत्राला आग लागली. मार्च महिन्यात आग लागण्याच्या १६ घटना घडल्या असून ३७.३० हेक्टर क्षेत्रात वणवा पेटला होता.
मार्च महिन्यात काहीशा प्रमाणात पाऊस पडल्याने आगजळीत घटना कमी प्रमाणात घडल्याचे सांगितले जाते. मात्र एप्रिल महिन्यात आगीच्या २४ घटना घडल्या. त्यामुळे ६२ हेक्टर वनक्षेत्र आगीने बाधित झाले होते. तर मे महिन्यात वणव्याच्या केवळ ३ घटना घडल्या. त्यात ५.५० हेक्टर वनक्षेत्राला आग लागल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.


व्याघ्र प्रकल्पातही आगजळीत क्षेत्राची नोंद
१२ डिसेंबर २०१३ रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र म्हणून राज्यातील पाचवे व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आले. यात नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगाव व कोका असे चार अभयारण्य व एक नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा समावेश असून एकूण ६५६.३६ चौ.किमी. क्षेत्रात प्रकल्प व्यापलेले आहे. या व्याघ्र प्रकल्पात वणवा लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. नागझिरा अभयारण्याच्या दोन हेक्टर क्षेत्रात आग लागली. तर कोका अभयारण्याच्या ११.५५० हेक्टर क्षेत्र व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या २२.५०० हेक्टर क्षेत्रात आग लागल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे. यात मोठी हानी झाली नसून केवळ पाला-पाचोळाच जळला. मात्र संरक्षण दल व त्यांच्या जवळील प्लॉवर मशीन्समुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे सांगण्यात आले

सर्वाधिक घटना नवेगावबांधमधील
गोंदिया वनविभागाच्या वनक्षेत्रात आग लागण्याचे सन २०१५ च्या तीन महिन्यात ४३ प्रकरण घडले. यात मार्च महिन्यात सालेकसा वनक्षेत्रात एका घटनेत १४ हेक्टर वनक्षेत्र जळाले. नवेगावबांध येथे नऊ घटनेत नऊ हेक्टर, सडक-अर्जुनी येथे एका घटनेत तीन हेक्टर, आमगाव येथे एका घटनेत १.५० हेक्टर तर अर्जुनी-मोरगाव येथे चार घटनांत १० हेक्टर वनक्षेत्रात आग लागण्याचे प्रकार घडले. एप्रिल महिन्यात नॉर्थ देवरी येथे एका घटनेत १.५० हेक्टर, सडक-अर्जुनी येथे एका घटनेत तीन हेक्टर, नवेगावबांध येथे १९ घटनांत ५१.५० हेक्टर तर अर्जुनी-मोरगाव येथे तीन घटनांत सहा हेक्टर वनक्षेत्राला आग लागली. तसेच मे महिन्यांत गोंदिया येथे एका घटनेत दोन हेक्टर वनक्षेत्र, तिरोडा येथे एका घटनेत १.५० हेक्टर तर सालेकसा येथे एका घटनेत २.५० हेक्टर वनक्षेत्रात वणवा लागल्याचे वनविभागाने नोंद केले आहे.

Web Title: In the summer of 105 hectares forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.