२० हजार हेक्टरमध्ये उन्हाळी भात लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:24 PM2019-03-18T22:24:20+5:302019-03-18T22:25:05+5:30
जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा खरिप हंगामाने शेतकऱ्यांना भरभरून धानाचे उत्पादन दिले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा जोमात असून यामुळेच जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. धानाच्या कोठारात सर्वाधीक लागवड क्षेत्र अर्जुनी-मोरगावचे ५ हजार १२७ हेक्टर आहे.
यंदा पावसाने शेतकऱ्यांना वेळीच साथ दिल्याने खरिपाचा हंगाम भरभरून निघाला. कधी नव्हे एवढे धानाचे उत्पादन यंदा झाले असून शेतकरी चांगलाच खुश दिसत आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या खेळीने हतबल होवून बसलेला शेतकरी खरिपाच्या निकालाने आता जोमात असून त्यांच्यात नवी आशा निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात यंदाही सिंचनाची सोय नसतानाही शेतकरी आहे त्या साधनांतून उन्हाळी घेण्याची तयारी दाखवित आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, प्रकल्पांतून सिंचनासाठी पाणी दिले जात नसतानाही सिंचनाची सोय असलेले शेतकरीच उन्हाळीसाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. तरिही एवढ्या मोठ्या क्षेत्रात उन्हाळी लागवड करण्यात आल्याने खरिपासोबतच आता उन्हाळीही शेतकºयांना भरभरून पावणार असल्याचे दिसते.
विशेष म्हणजे, जिल्हयात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वाधीक ५ हजार १२७ हेक्टर क्षेत्रात उन्हाळीची भाताची लागवड करण्यात आली आहे. तर गोरेगाव तालुक्यात सर्वात कमी १ हजार ५६४ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी आहे.
तिपटीने उन्हाळीच्या क्षेत्रात वाढ
जिल्ह्यात ७ हजार ७६० एवढे उन्हाळीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. म्हणजेच, किमान एवढ्या क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड अपेक्षीत असते. मात्र यंदा तिपटीने म्हणजेच २० हजार २०० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी भाताची लागवड करण्यात आली आहे. यावरून धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मागील वर्षींपासून लागलेली अवकळा लोपली असल्याचे म्हणता येईल. यंदा खरिपाने शेतकऱ्यांना ‘छप्पर फाडके’ दिले असतानाच उन्हाळीही भरभरून निघाल्यास धानाचे कोठार पुन्हा एकदा भरभरून निघणार.
बोअरवेलचे खोदकाम वाढले
प्रकल्पांतील पाण्याची स्थिती व उन्हाळ््यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने शेतीसाठी पाणी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशात ज्यांच्याकडे स्वत:ची सिंचनाची सोय आहे तेच उन्हाळी घेत आहेत. शिवाय शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून आता शेतकरी बोअरवेल खोदकामाकडे वळला आहे. यामुळे मात्र आता भूगर्भातील पाण्याची पातळीही झपाट्याने खालावणार यात शंका नाही.