सुनील मेंढे यांचा नवेगावबांध येथे काळे झेंडे दाखवून निषेध
By अंकुश गुंडावार | Published: May 6, 2023 05:15 PM2023-05-06T17:15:15+5:302023-05-06T17:15:42+5:30
Gondia News खा. मेंढे हे नवेगावबांध येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.
अंकुश गुंडावार
गोंदियाः नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील रॉक गार्डनचे व कॉन्फरन्सचे हॉल या दोन कामांचे गेल्या १४ वर्षांपासून लोकार्पण न झाल्याने व निवडून आल्यानंतर गेल्या चार वर्षापासून याबाबत कुठली चर्चा व बैठक खा. सुनील मेंढे यांनी लावली नाही. याच्या निषेधार्थ नवेगावबांध फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि.६) सकाळी ११:३५ वाजताच्या सुमारास खा. मेंढे हे नवेगावबांध येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.
खा. मेंढे हे निवडून आल्यावर सत्कार स्विकारण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यात आले होते. यावेळी येथील टी पॉइंट चौकात नवेगावबांध फाउंडेशनच्यावतीने खा. मेंढे यांना निवेदन देऊन या कामाची आठवण करून देण्यात आली होती. यावर बैठक लावून चर्चा करू असे आश्वासन खासदारांनी त्यावेळी दिले होते. पण त्या आश्वासनाची त्यांनी अद्यापही पुर्तत: न केल्याने फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. नवेगावबांध संघर्ष समितीच्यावतीने झालेल्या कामाचं लोकार्पण करा, अन्यथा दोषींवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीला धरून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष या नात्याने रामदास बोरकर यांनी लोकायुक्ताकडे दाद मागितली होती. यामध्ये लोकायुक्ताने गोदिया जिल्ह्याचे तत्कालीन दोन जिल्हाधिकारी व राज्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना या प्रकरणात दोषी ठरविले होते. परंतु वर्षा मागून वर्ष लोटूनही नवेगावबांध येथील पर्यटन संकुलातील त्या गार्डनचे व कॉन्फरन्सचे लोकार्पण न झाल्याने, या गोष्टीचा निषेध म्हणून नवेगावबांध येथे शनिवारी (दि.६) येथील आझाद चौक येथे खा. सुनील मेंढे हे येथील विश्रामगृहावरून कार्यक्रम स्थळी जात असताना आझाद चौक येथे रामदास बोरकर, मुकेश चाफेकर, घनश्याम कापगते यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. अचानक काळे झेंडे दाखवण्यात आल्यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ उडाला.
खा. मेंढे यांना आपण प्रत्यक्ष भेटून विनंती केली की, आपल्या हातून हे काम झालेले आहे. आपण त्याची डागडूजी करून ते लोकार्पण करावे, ही अपेक्षा होती. तरी सुद्धा त्यांनी ते केलं नाही. त्याचे स्मरण करून द्यावे आणि याकडे दुर्लक्ष केले म्हणून, आम्ही खासदारांना काळे झेंडे दाखवून शनिवारी नवेगावबांध येथे निषेध केला.
- रामदास बोरकर, अध्यक्ष, नवेगावबांध फाउंडेशन.