सकाळी उन, दुपारी वादळ, सायंकाळी पाऊस अन गारपीट; पुन्हा तीन दिवस अवकाळीचे संकट
By अंकुश गुंडावार | Published: April 22, 2023 06:19 PM2023-04-22T18:19:18+5:302023-04-22T18:20:31+5:30
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
गोंदिया : जिल्हावासीयांनी शनिवारी (दि.२२) सकाळी उन, दुपारी वादळ वारा आणि सायंकाळी गारपीट व पाऊस असा अनुभव घेतला. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत असल्याने ऊन्हाळी धानपीक संकटात आले आहे. तर शनिवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे उन्हाळी धानपिकांचे नुकसान झाले.
हवामान विभागाने गुरुवारपासून पुढील चार दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर शनिवारी दुपारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. तर सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी रय्यत येथे गारपीट झाली. तर जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाचा फटका उन्हाळी धानपिकाला बसला. उन्हाळी धानपिक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतांना अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने धानपिक धोक्यात आले आहे. तर ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.