प्रचाराचा सुपर संडे आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 05:00 AM2021-12-19T05:00:00+5:302021-12-19T05:00:02+5:30
ओबीसी प्रवर्गाच्या जागा आता खुल्या करून त्यासाठी १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे, तर उर्वरित जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जि. प. व पं. स.साठी एकूण ६९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागतो. त्यामुळे रविवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजल्यानंतर जाहीर प्रचार बंद करावा लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारताेफा थंडावणार आहेत.
ओबीसी प्रवर्गाच्या जागा आता खुल्या करून त्यासाठी १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे, तर उर्वरित जागांसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जि. प. व पं. स.साठी एकूण ६९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी २९३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.
त्यामुळे याविरोधात काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे यावर सुनावणी लांबणीवर गेल्याने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी केवळ चार दिवसांचा कालावधी मिळाला. कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत सर्वच उमेदवारांनी पोहोचण्याचा प्रयत्न केला.
आज, रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून जाहीर प्रचार बंद करावा लागणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी सभा, रॅली, रोड शोच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकरण तापले आहे.
सोशल मीडियाचा घेतला आधार
- सध्याची तरुण पिढी ही सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय आहे, तर सर्वच उमेदवारांना प्रचारासाठी केवळ चारच दिवसांचा कालावधी मिळाल्याने कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. उमेदवाराचे समर्थक देखील आपला उमेदवार कसा सरस आहे यासंबंधीच्या पोस्ट व्हायरल करीत होते.
दिग्गजांच्या प्रचारसभा आज
- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी मागील तीन दिवसांपासून प्रचारात पूर्णपणे झोकून दिले आहे. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सक्रिय आहेत. त्यातच रविवार जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे रविवार प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे.
दिग्गज उमेदवारांच्या लढतीकडे लक्ष
- जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांतर्फे दिग्गज उमेदवार रिंगणात आहे. तर काही प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष सुध्दा रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक यंत्रणा सज्ज
- जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान केंद्र, बूथ, निवडणूक साहित्य यांचे नियोजन जिल्हा निवडणूक यंत्रणेने पूर्ण केले आहे.