जिल्ह्याला आणखी २३ हजार डोसेसचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:55+5:302021-07-23T04:18:55+5:30
गोंदिया : मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण पु्न्हा सुरळीत सुरू झाले असून आतापर्यंत ५४३९१८ ...
गोंदिया : मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण पु्न्हा सुरळीत सुरू झाले असून आतापर्यंत ५४३९१८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याला आणखी १५००० कोविशिल्ड व ८००० कोव्हॅक्सिनचा पुरवठा करण्यात आला. यामुळे शुक्रवारीही लसीकरण होणार आहे.
राज्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला सुरुवात झाली व या गटातील तरुण-युवक लसीकरणासाठी सरसावले. यामुळे लसीकरणाची आकडेवारी वाढली व लसींचा तुटवडा होऊ लागला. यामुळे राज्यात सर्वत्र लसींच्या पुरवठ्यावर परिणाम झाला व त्यामुळे लसीकरणाला ब्रेक द्यावा लागत होता. परिणामी कित्येकांना केंद्रावर जाऊन परत येण्याची वेळ आल्याचेही दिसले. मात्र आता मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा नियमित होत असून जिल्ह्यातील लसीकरण पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले आहे.
गुरुवारी जिल्ह्यात सुमारे ४५०० डोस उपलब्ध होते व त्यामुळे आज, शुक्रवारी लसीकरणाला घेऊन भीतीच होती. मात्र गुरुवारी जिल्ह्याला १५००० कोविशिल्ड व ८००० कोव्हॅक्सिन असे एकूण २३ हजार डोस मिळणार होते व त्यासाठी गाडी नागपूरला पाठविण्यात आली होती. यामुळे शुक्रवारी लसीकरणाला ब्रेक देण्याची गरज पडणार नाही. एकंदर लसीकरण सुरळीत होत असल्याने पुन्हा एकदा लसीकरणाला गती आली आहे.
---------------------------------------
दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष नको
जिल्ह्यात आतापर्यंत ५४३९१८ नागरिकांचे लसीकरण झाले असून यामध्ये ४३५४५० नागरिकांनी पहिला, तर १०८४६८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच, ५० टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे अत्यंत आवश्यक असून त्यानंतर आपण सुरक्षित आहोत, अशा स्पष्ट सूचना आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण उशीर न करता दुसऱ्या डोसचा वेळ आल्यास लगेच डोस घेण्याची गरज आहे.