पुरवठा अधिकाऱ्यांचे तक्रारीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:23+5:302021-02-16T04:30:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा तालुक्यातील पुरवठा अधिकारी हे तक्रारदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असून, तिरोडा येथील एका व्यक्तीला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्यातील पुरवठा अधिकारी हे तक्रारदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असून, तिरोडा येथील एका व्यक्तीला हाताशी धरून काम करत आहेत तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेली माहिती देण्यासही टाळटाळ करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी अधिकारी आणि ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी दिलीप लिल्हारे यांनी अन्न व पुरवठा विभागाच्या आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांनीही याची दखल घेत, याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत.
तिरोडा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गेल्या काही दिवसांपासून अनागोंदी कारभार सुरू आहे. येथील एका गॅस एजन्सीच्या संचालकाशी साठगाठ करून एका खासगी व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दिलीप लिल्हारे यांनी केला आहे. पुरवठा विभागाकडे या संदर्भात लिल्हारे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. या प्रकरणावर ३१ आॅगस्ट, २०२० रोजी सुनावणी घेण्यात आली होती. तेव्हा संबंधित व्यक्ती १९९५पासून पुरवठा विभागात कुठल्याही पदावर कार्यरत नसल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, तो अद्यापही याच विभागात बसून कामे करत असून, स्वस्त धान्य दुकानदारांना फसविण्याची धमकी देत असल्याचा आरोपही लिल्हारे यांनी केला आहे. पुरवठा अधिकारी याची दखल घेत नसल्याचे याविषयीची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी होऊनही त्यांनी याप्रकरणी कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे खोटी माहिती पुरवून दिशाभूल करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी लिल्हारे यांनी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची नागपूर पुरवठा विभागाच्या उपायुक्तांनी दखल घेत, सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.