मागणीच्या १० टक्केच बारदाना पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:20 AM2021-06-17T04:20:24+5:302021-06-17T04:20:24+5:30
तिरोडा : यंदा आधीच रब्बी हंगामातील धानाची उशिरा खरेदी सुरू झाली. आता बारदाना उपलब्ध नसल्याने पुन्हा खरेदी थांबविण्यात आली ...
तिरोडा : यंदा आधीच रब्बी हंगामातील धानाची उशिरा खरेदी सुरू झाली. आता बारदाना उपलब्ध नसल्याने पुन्हा खरेदी थांबविण्यात आली आहे. खरेदी केंद्राच्या मागणीच्या केवळ १० टक्के बारदाना पुरवठा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्राबाहेर उघड्यावर पडले आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आल्याचे चित्र आहे.
मागील खरीप हंगामात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल अद्यापही झालेली नाही. त्यामुळे गोदाम भरलेले आहेत. शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर उन्हाळी हंगामात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. तालुक्यात १५ केंद्रे असून त्यात वडेगाव, नवेझरी, कवलेवाडा, अर्जुनी, चिखली या केंद्रांचा समावेश आहे. धान खरेदी केंद्रांनी बारदान्याची मागणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदविली आहे. मात्र, त्यांच्याकडून मागणीच्या केवळ १० टक्केच पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी धानाची विक्री करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना केंद्राबाहेर धान ठेवून आपला नंबर येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बारदान्याअभावी आठवडाभर देखील खरेदी होऊ शकली नाही. एकंदरीत या विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत असल्याचा आरोप केला जात आहे.