५५ रुपये प्रती किलो तुरदाळीचा ८० रुपये दराने पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 09:45 PM2018-05-15T21:45:46+5:302018-05-15T21:45:54+5:30
शासनाने तुरदाळीचा ५५ रुपये प्रती किलो दराने स्वस्त धान्य दुकानदार व सेवा सहकारी सोसायट्यांना पुरवठा केला. मात्र शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी या तुरदाळीचा शाळांना ८० रुपये प्रती किलो दराने पुरवठा केल्याची बाब उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने तुरदाळीचा ५५ रुपये प्रती किलो दराने स्वस्त धान्य दुकानदार व सेवा सहकारी सोसायट्यांना पुरवठा केला. मात्र शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांनी या तुरदाळीचा शाळांना ८० रुपये प्रती किलो दराने पुरवठा केल्याची बाब उघडकीस आली आहे.
राज्यात मागील वर्षी तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून शासनाने हमीभावानुसार लाखो क्विंटल तुरीची खरेदी केली. तूर खरेदीवरुन बरेच राजकारण झाले.तर अद्यापही काही जिल्ह्यात तूर खरेदीचा तिढा सुटला नसून शेतकरी विक्री केलेल्या तुरीच्या चुकºयांच्या प्रतीक्षेत आहेत. शासकीय गोदामात मोठ्या प्रमाणात तुरीचा साठा झाल्याने शासनाने या तुरीची भरडाई करुन दाळ तयार केली. तसेच ही तुरदाळ स्वस्त धान्य दुकान आणि सेवा सहकारी सोसायट्यांना ५५ रुपये प्रती किलो दराने उपलब्ध करुन दिली. यासाठी शासनाने निविदा प्रक्रिया देखील राबविली. तुरदाळीची मागणी नोंदविण्याचे आवाहन केले. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनवर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. गोंदिया येथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत जवळपास २३०० क्विंटल तुरदाळ विक्री केल्याची माहिती आहे. यात गैर नाही. मात्र शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाºया कंत्राटदारांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून तुरदाळीची ५५ रुपये प्रती किलो दराने खरेदी करुन तीच तुरदाळ जिल्ह्यातील शाळांना ८० प्रती किलो दराने विक्री केल्याची माहिती आहे. यावर काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी आक्षेप घेतला असता कंत्राटदारांनी तुरदाळीच्या पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्च लागल्याने किंमत वाढल्याचे सांगितले. त्यामुळे पुरवठा करणाऱ्या कंत्रादाराने तुरदाळीवर प्रती किलो मागे २५ रुपये अतिरिक्त घेतल्याची ओरड आहे. पॅकिंग आणि वाहतुकीचा खर्च जोडला तरी कंत्राटदारानी अतिरिक्त पैसे घेतल्याची ओरड आहे. शासनाने विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याची योजना आहे. गोंदिया जिल्ह्यात १०६९ शाळा आहे. या शाळांना शासनाने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. कंत्राटदाराने जिल्ह्यातील काही शाळांना ८० रुपये प्रती किलो दराने तुरदाळीचा पुरवठा केल्याची माहिती आहे. याला काही शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुध्दा दुजोरा दिला.
चुकीच्या धोरणाचा फटका
शासनाने कंत्राटदारामार्फत शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्याऐवजी थेट शाळांना पुरवठा केला तर मोठ्या प्रमाणात बचत होवू शकते. तसेच पोषण आहार साहित्याच्या दर्जावर नेहमीच उपस्थित केल्या जाणारा प्रश्न सुध्दा मार्गी लागू शकतो. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने कंत्राटदार मनमर्जीने दर आकारुन पोषण आहार साहित्याचा पुरवठा करीत असल्याचे चित्र आहे.
शिक्षण विभाग अनभिज्ञ
शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारकडून पुरवठा केले जाणारे साहित्य दर्जेदार आहे किंवा नाही याची चाचपणी शिक्षण विभागाकडून केली जात नाही. पोषण आहाराचा दर्जा तपासण्यासाठी कुठलीच यंत्रणा नसल्याची माहिती आहे. एकंदरीत शिक्षण विभाग यासर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे याच विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.