शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांचा पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:12 AM2021-05-04T04:12:26+5:302021-05-04T04:12:26+5:30
गोंदिया : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय ...
गोंदिया : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कृषी विभागाने नियोजन करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांचा पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार सुनील मेंढे, आ.अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे व सहसराम कोरोटे, माजी आ.राजेंद्र जैन, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे उपस्थिती होते. पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, कृषी विभागाने समन्वय साधून रासायनिक खते, बी-बियाणे, शेतीशी संबंधित अवजारे, फवारणी यंत्रे व कीटकनाशके आदींची शेतकऱ्यांना उपलब्धता करून, देताना पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना पीक विमा सहज आणि सुलभ पद्धतीने कसा काढता येईल, या दृष्टीने नियोजन करावे. पारंपरिक पिकांसोबतच जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, खते-बियाणे प्रमाणित करण्यासाठी जिल्ह्यात प्रयोगशाळा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगितले.
......
शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्या
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन प्रलंबित असतील, त्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज कनेक्शन द्यावे. सामान्य शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जवाटप करावे. खरीप हंगाम सन २०२१-२२ करिता जे नियोजन केले आहे, त्याची कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी. खा.सुनील मेंढे म्हणाले, जिल्ह्यातील ५,२८१ वीज कनेक्शन प्रलंबित आहेत, याबाबत कार्यवाही करण्यात यावी. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नावीन्यपूर्ण योजना राबवाव्यात.
..........
२ लाख २० हजार हेक्टरवर खरिपाची लागवड
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी घोरपडे यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्रावर पिके घेण्याचे नियोजन आहे. भातपीक १ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर घेण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
...........
विमा कंपनीवर कारवाई करा
मागील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतला होता. त्यापैकी अनेक शेतकरी पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने चुकीची आकडेवारी वापरून नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याची बाब आ.मनोहर चंद्रिकापुरे यांनी निदर्शनास आणून दिली.
............