गोंदिया जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरमधे शिळ्या अन्नाचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:52 AM2020-08-07T11:52:12+5:302020-08-07T11:52:32+5:30
तिरोडा तालुक्यातील ग्राम सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना शिळ्या अन्नाचा पुरवठा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : २ दिवसांपूर्वीच गोंदिया-बालाघाट मार्गावरील जिनीयस लॉन येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर गुरूवारी (दि.६) तिरोडा तालुक्यातील ग्राम सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना शिळ्या अन्नाचा पुरवठा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुन्हा क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाहेरील जिल्हा व राज्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाते. तिरोडा तालुक्यात ४ ठिकाणी क्वारंटाईन सेटर स्थापन करण्यात आले आहे. त्यापैकी सरांडी येथील शासकीय निवासी शाळेतील क्वारंटाईन सेटंरमधील नागरिकांना गुरूवारी सकाळी जेवणाचा पुरवठा करण्यात आला.
तेथील नागरिकांनी जेवणाचे पार्सल उघडले असता त्यांना चक्क शिळे अन्न देण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्व नागरिकांनी जेवण न करताच ते पार्सल तसेच पॅक करुन ठेवले तसेच याची फोनवरुन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केली. पुरवठा करण्यात आलेल्या जेवणाच्या पार्सलचे फोटो काढून ते सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप केले.
या सर्व प्रकाराला घेवून क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. शिळे अन्न देऊन नागरिकांना आजारी पाडण्याचा हा प्रकार असून प्रशासनाने याची दखल घेवून जेवणाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना योग्य सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याची तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याची ओरड येथील नागरिकांची आहे. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिक सुरक्षित राहण्याऐवजी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे बाहेरुन येणारे नागरिक क्वारंटाईन सेंटरमध्ये राहणे पसंत करीत नसून ते बाहेरुन आल्यानंतर याची माहिती प्रशासनाला न देता थेट घरी जात आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना शिळ्या जेवणाचा पुरवठा करण्यात आल्याची तक्रार येथील नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच जेवणाच्या पार्सलचे फोटो काढून त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविले. याचीच दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी तळपदे यांना क्वारंटाईन सेंटर येथे जावून चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.
२ दिवसांत दुसरे प्रकरण
क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. त्यात २ दिवसांपूर्वीच गोंदिया-बालाघाट मार्गावरील जिनीयस लॉन येथील क्वारंटाईन कक्षातील नागरिकांना दिलेल्या जेवणात अळ्या आणि खडे आढळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आज तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील क्वारंटाईन कक्षातील नागरिकांना शिळ्या अन्नाचा पुरवठा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या कक्षाची जबाबदारी असलेले अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.