प्रभारी शल्यचिकित्सकाची कर्मचाऱ्यावर दडपशाही
By admin | Published: October 10, 2015 02:22 AM2015-10-10T02:22:46+5:302015-10-10T02:22:46+5:30
केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.एच. अग्रवाल यांनी आपल्याला मिळालेल्या चार दिवशीय...
प्रभारीपदाचा केला गैरवापर : नेत्रदान समुपदेशकाला पदावरून हटविले
गोंदिया : केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय येथील प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.एच. अग्रवाल यांनी आपल्याला मिळालेल्या चार दिवशीय प्रभाराचा गैरवापर करून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण न मागविता आपल्या अधिनस्त समुपदेक पदावर कार्यरत अनुपम राजेंद्र बंसोड नामक कर्मचाऱ्याला पदावरून कमी करण्याचे आदेश दिले. हे नियमाविरूद्ध असून सदर प्रकरणाची चौकशी करून डॉ. अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनुपम बंसोड यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते हे मुंबई येथे कार्यालयीन कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांनी चार दिवसांकरिता आपला जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार नेत्र शल्यचिकित्सक डॉ. आर.एच. अग्रवाल यांना दिला होता. अनुपम बंसोड हे मागील तीन वर्षांपासून नेत्र विभागात नेत्रदान समुपदेशक पदावर कार्यरत आहेत.
मार्च २०१५ पासून नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अग्रवाल हे अनुपम बंसोड यांना स्वत:चे खासगी काम सांगायचे. चंद्रपूर येथे पाठविणे, मुलीच्या कामानिमित्त नाशिकला पाठविणे, घरचे विद्युत बिल भरण्यासाठी पाठविणे, बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी पाठविणे आदी कामे अनुपमला करण्यासाठी लावायचे.
मात्र सदर कामे डॉ. अग्रवाल यांची स्वत:ची खासगी कामे असल्यामुळे बंसोड यांनी ते करणे नाकारले. त्यामुळेच डॉ. अग्रवाल यांनी सूड भावनेतून प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा गैरफायदा घेत व त्यांना सेवा समाप्तीचे अधिकार नसतानाही बेकायदेशीरपणे बंसोड यांना कामावरून कमी करण्याचे आदेश काढले.
नेत्रदान समुपदेशक अनुपम बंसोड यांना कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मागविण्यात आले नाही. तसेच त्यांची कसलीही चौकशी करण्यात आली नाही.
३० व्या नेत्रदान पंधरवाड्यादरम्यान नेत्रगोलक जमा न झाल्यामुळे काम अत्यंत असमाधानकारक असल्याचे कारण दाखवून नियमबाह्यरित्या डॉ. अग्रवाल यांनी २९ सप्टेंबर २०१५ पासून समुपदेशक बंसोड यांना पदावरून कमी केल्याचे आदेश दिले आहे. ही बाब नियमबाह्य असून सदर आदेश मागे घेण्यात यावे यासाठी अनुपम बंसोड यांनी डॉ. अग्रवाल यांना विनंती करूनही त्यांनी उलट शिवीगाळ केली, असा आरोप बंसोड यांनी केला आहे.
सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्वरित चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. न्यायासाठी बंसोड यांनी आरोग्य सचिव मुंबई, संचालक मुंबई, एनआरएचएम अभियान संचालक, उपसंचालक नागपूर व जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. आता जिल्हा शल्यचिकित्सक कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.