आश्चर्य.. ४३ वर्षांनंतरही मानाकुही प्रकल्पाचे लिकेज सापडेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 05:00 AM2021-10-03T05:00:00+5:302021-10-03T05:00:02+5:30
एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.
विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : जेव्हा पाण्याची किमत कळते आणि प्रत्यक्ष पाण्याची टंचाई भासते तेव्हा पाण्याचा महत्त्व कळते. यासाठी शासन प्रशासन स्तरावर पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. पण तालुक्यात असे कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या मानाकुही प्रकल्पाकडे शासनाची वक्रदृष्टी झाल्याने या प्रकल्पाची पूर्णपणे वाताहत झाली आहे.
तालुक्यातील ८० ते ९० टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा कृषी आणि आधारित पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. अशात सिंचनाची सोय असलेली शेती महत्त्वाची असून, सिंचन प्रकल्प येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात. ही बाब लक्षात घेता तालुक्यातील गोर्रे-मानागढ-रामाटोला मार्गाच्या निकट पर्वत रागांच्या पायथ्यालगत मानाकुही प्रकल्प तयार करण्याचा निर्णय शासनाने १९७८ मध्ये घेतला होता. त्यानंतर ०.७९० दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता असलेला जलाशय तयार करण्यात आले. त्याला एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. पाण्याचे वितरण शेतीपर्यंत वितरण व्हावे म्हणून कालवा तयार केला नाही. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा अपव्यय सुरूच आहे.
मानाकुही प्रकल्प किती उपयोगाचा
- मानाकुही तलावाच्या गेटमधील दुरुस्ती कायम स्वरूपाची करून शेतीला सिंचन करण्यासाठी ७.५० कि.मी.चा मुख्य कालवा आणि ६.२ कि.मी.चा उपकालवा तयार केल्यास मानागड, रामाटोला, शिकारीटोला, भरीटोला, कुलरभट्टी या गावातील जवळपास २१९ हेक्टरपेक्षा जास्त शेतीला खरीप आणि रबी दोन्ही हंगामात पाणी मिळू शकते. सोबतच मानाकुही जलाशयात अतिरिक्त जलसाठा वाढल्यास तो पाणीनजीकच्या मानागड तलावात सोडण्याची व्यवस्था झाली, तर वाया जाणारा पाणी उपयोगात येऊ शकतो तो पाणी सालेकसा शहराला पाणीटंचाईच्या वेळी उन्हाळ्यात मोठा लाभदायक ठरू शकतो.