गोळी झाडणाऱ्या आरोपीचे आत्मसमर्पण

By admin | Published: June 15, 2015 12:42 AM2015-06-15T00:42:52+5:302015-06-15T00:42:52+5:30

गोंदिया नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे नेते व जुन्या बस स्थानकाजवळील रहिवासी छेदीलाल इमलाह (४६) यांची ...

Surrender of the accused who shot dead | गोळी झाडणाऱ्या आरोपीचे आत्मसमर्पण

गोळी झाडणाऱ्या आरोपीचे आत्मसमर्पण

Next

छेदीलाल इमलाह हत्याकांड : गोंदियात कडकडीत बंद, तणावपूर्ण शांतता
गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या सफाई कामगारांचे नेते व जुन्या बस स्थानकाजवळील रहिवासी छेदीलाल इमलाह (४६) यांची जुन्या भांडणावरून दोन दुचाकीस्वारांनी शनिवारी सायंकाळी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. या घटनेमुळे गेल्या २४ तासात गोंदिया शहरात तणावसदृश परिस्थिती आहे. दरम्यान इमलाह यांच्यावर गोळी झाडणाऱ्या शाहरूख खान (२१) रा.यादव चौक या आरोपीने शनिवारी रात्री ९.१० वाजता पोलिसात आत्मसमर्पण केले तर येशूदास सुधाकर हरपाल (२३) रा.सतनामी मोहल्ला, गोंदिया या दुसऱ्या आरोपीला रविवारी पोलिसांनी अटक केली.
या घटनेमागे जुनी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे संंबंधित सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीवरून ईमलाह यांच्या समर्थकांनी रविवारी गोंदिया बंदचे आवाहन केले होते. त्यासाठी शहराच्या अनेक भागात त्यांचे समर्थक दिवसभर फिरत होते. त्यामुळे कोणीही दुकान उघडले नाही. कोणतीही अनुचित घटना होऊन नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून शहरात सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
दोन महिन्यांपूर्वी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणाचा संबंध छेदीलाल इमलाह यांच्या हत्येशी असल्याची चर्चा होत आहे. नगर परिषदेच्या अस्थायी सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी छेदीलाल इमलाह नेहमीप्रमाणे आंबेडकर चौकात सायंकाळी ६ वाजता दुचाकीने फेरफटका मारण्यासाठी आले होते. पाठक कँटीनसमोर ते उभे असताना चेहरा झाकून असलेले दोन युवक दुचाकीने तिथे आले. छेदीलाल यांना कसलीही संधी न देता पिस्तूलमधून त्यांच्या डोक्यावर गोळी झाडली. यात छेदीलाल इमलाह यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर त्या युवकांनी तेथून पळ काढला.
छेदीलाल यांचे बंधू भीम लक्ष्मण इमलाह यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपींमध्ये नगरसेवक पंकज यादव व त्यांचे बंधू लोकेश उर्फ कल्लू यादव रा.यादव चौक (गोंदिया) यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांच्याच सांगण्यावरून व जुन्या वादातून इमलाह यांची हत्या करण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे. मात्र त्यात किती तथ्य आहे याची तपासणी पोलीस करीत आहेत.
याप्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३४; अनुसूचित जाती-जमाती अपराध प्रतिबंध कायद्याच्या कलम ३ (२) व भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास गोंदिया शहर पोलीस करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

चायनिज बनावटीची
रिव्हॉल्व्हर जप्त
या घटनेत हल्लोखोर युवकांनी चायनिज बनावटीची पिस्तुल वापरली. रविवारी दुसऱ्या आरोपीला अटक केल्यानंतर इमलाह यांना मारण्यासाठी वापरलेली ती पिस्तुलही पोलिसांनी जप्त केली. ती पिस्तुल त्यांच्याकडे कुठून आली, त्याचा परवाना त्यांच्याकडे होता का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

आधी अटक करा, मगच मृतदेह उचलू
इमलाह यांच्या मृतदेहाचे रात्रीच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. मात्र जोपर्यंत संशयित यादव बंधूंना अटक करणार नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही, अशी भूमिका घेत इमलाह यांच्या समर्थक व नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केटीएस रुग्णालयाच्या आवारात धरणे देणे सुरू केले. सोबतच आंबेडकर चौकात काही वेळासाठी रास्ता रोको केला.
नाना पटोलेंनी केले जमावाला शांत
दरम्यान खासदार नाना पटोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी रुग्णालयाला भेट देऊन ईमलाह समर्थकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. संशयित सर्व आरोपींना अटक केली जाईल, एवढेच नाही तर पोलीसवाले यात दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल. अन्यथा आपणही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरू, असे आश्वासन यावेळी खा.पटोले यांनी जमावाला दिले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच गोंदिया बिहारसारखे झाले असून आपण हे प्रकार थांबविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे खा.पटोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वेळ पडल्यास या घटनेच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Surrender of the accused who shot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.