छत्तीसगड, झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

By अंकुश गुंडावार | Published: April 26, 2023 01:27 PM2023-04-26T13:27:38+5:302023-04-26T13:36:15+5:30

आयईडी पेरण्यात होते निपुण: शस्त्रांसह केले समर्पण

Surrender of nine Naxalites active in Chhattisgarh, Jharkhand | छत्तीसगड, झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

छत्तीसगड, झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

googlenewsNext

गोंदिया : बलरामपूर (छत्तीसगड) जिल्ह्यातील सामरी पोलीस स्टेशन परिसरात आणि लगतच्या झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या नऊ नक्षलवाद्यांनी बलरामपूरचे पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांच्यासमोर मंगळवारी (दि.२५) आत्मसमर्पण केले. यापैकी तीन नक्षलवाद्यांनी एक लोडेड बंदूक आणि एकाने आयईडी आणि स्फोटकांसह आत्मसमर्पण केले आहे. यातील बहुतांश नक्षलवादी हे शस्त्र चालवण्यात, नक्षलवादी पथकात सेन्ट्री ड्युटी करण्यासोबतच सुरक्षा दलांशी सामना आणि आयईडी पेरण्यातही निपुण आहेत.

पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार बलरामपूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांच्या विरोधात सतत शोधमोहीम राबवली जात आहे. भूतकाळात, ऑपरेशन्स दरम्यान, बलरामपूर पोलिसांनी समरीपथ पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी पोलीस दलाला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने भूगर्भात पेरलेले आयईडी आणि इतर स्फोटक साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले होते.

बलरामपूर पोलिसांची नक्षलवाद्यांविरुद्धची सततची कारवाई आणि शोध मोहिमेचा दबाव आणि पोलीस स्टेशन समरीपथच्या हद्दीतील पुंडग आणि भुताहीमोड या गावांमध्ये नवीन छावण्या सुरू करणे, दुर्गम नक्षलग्रस्त भागात सुरू असलेले जनजागृती कार्यक्रम यामुळे हे नक्षलवादी प्रभावित झाले आहेत. नक्षल भागातील कारवायात यापूर्वी सात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. यावेळी नऊ नक्षलवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला होता.

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये यांचा समावेश

आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी बलरामपूर जिल्ह्यातील सामरी पोलीस स्टेशन हद्दीतील पुंडग, पाचफेडी, चुनचुना, पिपरदाबा या गावांचे रहिवासी आहेत. या सर्व नक्षलवाद्यांनी कमांडर स्पेशल एरिया कमिटी विमल यादव आणि रिजनल कमिटीचे कंपनी कमांडर नवीन यादव, शेखर कोरवा, जगदीश बुधा, विनय, बिरसाई, रवी आदींसोबत सामरी पोलीस स्टेशन परिसरात आणि सीमा झारखंडमध्ये सक्रिय काम केले आहे.

वेगवेगळ्या दलममध्ये होते सक्रीय

झारखंडमधील बुधापहाड भागात नक्षलवादी संघटनेसोबत सतत काम केलेले आहेत. आयईडी पेरण्याबरोबरच काही नक्षलवादी सेन्ट्री ड्युटी, अन्न तयार करणे आणि पोलिस दलावर हल्ल्याच्या घटनांमध्येही सहभागी राहिलेले आहेत. पोलीस आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावामुळे हे सर्वजण मध्यंतरी काही काळ लपून राहत होते. वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी आत्मसमर्पण केले.

Web Title: Surrender of nine Naxalites active in Chhattisgarh, Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.