गरज सरो, अन् वैद्य मरो!
By admin | Published: July 21, 2014 11:54 PM2014-07-21T23:54:35+5:302014-07-21T23:54:35+5:30
गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचे दर्शन सध्या गोंदियावासीयांसाठी दुर्लभ झाले आहे. निवडणुकीआधी अनेक जनसमस्यांवर ‘आंदोलना’ची भाषा करणाऱ्या नानाभाऊंना आता जनसमस्यांची आठवणही येत नाही.
मनोज ताजने - गोंदिया
गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचे दर्शन सध्या गोंदियावासीयांसाठी दुर्लभ झाले आहे. निवडणुकीआधी अनेक जनसमस्यांवर ‘आंदोलना’ची भाषा करणाऱ्या नानाभाऊंना आता जनसमस्यांची आठवणही येत नाही. एवढेच काय आता ते स्वत:च्याच जनता दरबाराकडे पाठ फिरवू लागले आहे. सत्ता आली की माणूस बदलतो असे म्हणतात, पण ‘लोकनेता’ म्हणून बिरूद लावणारे नानाभाऊ इतक्या लवकर बदलतील असे कोणालाही वाटले नव्हते.
शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव द्या, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, अशा मागण्या करून त्यासाठी विधानसभेपर्यंत आवाज बुलंद करणाऱ्या नानाभाऊंना शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतले. आपल्यासाठी भांडणारा हा भूमीपूत्र नेता आपले सुखदु:ख समजून घेतो या विश्वासानेच सर्वांनी त्यांना मतांचे दान देत आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत पाठविले. पण या जिल्ह्याचे खासदार आता या जिल्ह्यासाठीच ‘पाहुणे’ झाले आहे. राजकारणी लोक सार्वजनिक क्षेत्रात वावरताना एखाद्या कसलेल्या अभिनेत्याला मागे टाकतील असा अप्रतिम अभिनय करीत असतात. हा अभिनय इतका बेमालुम असतो की तो अभिनय आहे याची जाणीवही लोकांना होत नाही. पण गोंदियावासीयांना हळूहळू आता याची जाणीव व्हायला लागली आहे.
खासदारकीच्या दोन महिन्यात नानाभाऊंनी सत्कार आणि पक्षाचे मेळावे वगळता लोकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी किती वेळा गोंदियात पाय ठेवले हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण अलिकडे तर त्यांना गोंदियातील समस्या कोणत्या आहेत याचाही विसर पडलेला आहे. येथील एकाही समस्येवर त्यांनी अजून तरी एक शब्दही उच्चारलेला नाही. इतर समस्यांचे सोडा, पण ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्यावर ‘आपला माणूस’ म्हणून विश्वास टाकला त्या शेतकऱ्यांच्या समस्यांचाही त्यांना विसर पडावा? हे आश्चर्यकारकच आहे. केंद्र सरकारने यावर्षी धानाच्या हमीभावात अवघी ५० रुपये वाढ केली. ही दरवाढ म्हणजे तमाम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. पण नानाभाऊ जाणीवपूर्वक हे सर्व विसरले. शेतकऱ्यांविषयी सहानुभूती आणि तळमळ वाटण्याऐवजी त्यांना सत्ताप्रेम जास्त महत्वाचे वाटले. नानाभाऊंची साधलेली ही चुप्पी म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात नाही तर दुसरे काय आहे?
परवा गोंदियात त्यांनी प्रथमच जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आपल्या अमूल्य वेळातून वेळ काढून दोन तास वेळ देण्याचे ठरविले होते. भाजपच्या जिल्हा कार्यालयात त्यासाठी अनेक लोक विविध समस्या, तक्रारी मांडण्यासाठी हजर झाले. पण नानाभाऊ ‘येत आहे, येत आहे’ म्हणता म्हणता ५ वाजताऐवजी चक्क रात्री ९ वाजता पोहोचले. पण तोपर्यंत त्यांची वाट पाहून अनेक जण आल्यापावली निराश होऊन परतले. नानाभाऊंना लोकांचा आता एवढा कंटाळा यायला लागला आहे का, की हा प्रकार म्हणजे ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशातला आहे हेच लोकांना कळायला मार्ग नाही. गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवत आस्थेने विचारपूस करणारे नानाभाऊ ते हेच का? असा प्रश्न आता लोकांना पडत आहे. लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी त्यांनी वेळीच सावध व्हावे हीच अपेक्षा.