पळून आलेल्या महिलेस केले कुटुबीयांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:18 PM2018-03-08T22:18:24+5:302018-03-08T22:18:24+5:30
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बेलहारी येथून घरून पळून आलेल्या एका ३३ वर्षीय महिलेला रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बेलहारी येथून घरून पळून आलेल्या एका ३३ वर्षीय महिलेला रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. एवढेच नव्हे तर तिच्याजवळून मिळालेले ६३ हजार रूपये रोख व एक १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल सुद्धा कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.
सदर महिला ५ मार्च रोजी घरून बेपत्ता झाली होती. राजनांदगाव रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक एस.के. दुबे यांनी गोंदियातील रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम यांना त्यांच्या वॉट्सअॅपवर याची माहिती दिली. मेश्राम व त्यांची टास्क टीम ज्यात महिला आरक्षक मंजुलता, पी.एल. पटेल, के. प्रधान यांना सोबत घेवून ते रेल्वे स्थानकावर भ्रमण करीत होते.
दरम्यान रात्री ९ वाजताच्या सुमारास एक महिला हातात पर्स घेवून घाबरलेल्या स्थितीत एकटीच असल्याची त्यांना आढळली. चौकशी केल्यावर तिने काहीही उत्तर दिले नाही. सदर महिलेचा फोटो त्वरित उपनिरीक्षक दुबे यांच्या वॉट्सअॅपवर पाठविण्यात आला. दुबे यांनी सदर फोटो बेपत्ता झालेल्या महिलेच्या भावाला दाखविला.
महिलेच्या भावाने तात्काळ उपनिरीक्षक मेश्राम यांना फोन करून सदर फोटो बेपत्ता झालेल्या त्यांच्या बहिणीचेच असल्याचे सांगितले. ६ मार्च रोजी सदर महिलेचा भाऊ गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात पोहोचला व आपल्या बहिणीची ओळख पटवून देवून आपल्या सोबत घेवून गेला.
सदर महिलेजवळ एक पर्स होती. त्यात ६३ हजार ६५० रूपये होते. तसेच एक १५ हजार रूपये किमतीचा मोबाईलही होता. या दोन्ही वस्तू महिलेच्या भावाला सोपविण्यात आल्या. भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बहिणीचे मानसिक संतुलन योग्य नसल्यामुळे तिने घरून पलायन केले.