सूर्याटोलालाही मिळावा आवास योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:34+5:302021-07-11T04:20:34+5:30
गोंदिया : शहरातील सूर्याटोला भाग प्रभाग क्रमांक १३ मध्ये मोडतो. हा परिसर मोठा आहे. परंतु आबादीच्या जागेवर ही वस्ती ...
गोंदिया : शहरातील सूर्याटोला भाग प्रभाग क्रमांक १३ मध्ये मोडतो. हा परिसर मोठा आहे. परंतु आबादीच्या जागेवर ही वस्ती वसली असल्यामुळे येथे असलेल्या गरजवंतांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळू शकत नाही. नगरपालिका प्रशासनाने या विषयात लक्ष घालून घरकुलांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.
शहराच्या पश्चिम टोकाला सूर्याटोला ही वस्ती आहे. या वस्तीचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास झाला. येथे वैद्यकीय महाविद्यालय, महावितरणचे कार्यालय आणि रेल्वे फाटक असल्याने या भागाचा विस्तार होत गेला. रामनगराला जोडला गेल्याने या वस्तीला अधिकच महत्त्व प्राप्त झाले. सूर्याटोला गोंदिया पालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये मोडतो. ही वस्ती आबादीच्या जागेवर वसली आहे. त्यामुळे येथील जमिनी अकृषक होऊ शकत नाही. परिणामी येथील नागरिकांना शासनाच्या योजनांचे लाभ देखील मिळत नाहीत. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या आवास योजनांचा लाभ देखील या भागात अद्याप पोहोचू शकलेला नाही. प्रामुख्याने गरीब आणि गरजवंत कुुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे सातबारादेखील आहे. असे असून देखील येथील नागरिक घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत. स्थानिक नागरिकांनी अनेकदा ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर पालिकेच्या लक्षात आणून दिली. मात्र, पालिकेने त्याकडे कानाडोळा केला. तातडीने येथील नागरिकांच्या या प्रमुख समस्येकडे लक्ष घालून घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.