पोलीस कोठडीत आरोपीचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:34+5:302021-05-23T04:28:34+5:30
गोंदिया : चोरीच्या प्रकरणात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपीचा ...
गोंदिया : चोरीच्या प्रकरणात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२२) सकाळी ५.१५ वाजता उघडकीस आली. यामुळे मात्र आमगाव शहरात चांगलेच वातावरण तापले होते. राजकुमार अभयकुमार धोती (३०, रा.कुंभारटोली) असे मृताचे नाव आहे.
आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोन वेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करण्यात आली आहे. या चोरीचा छडा लावताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुंभारटोली येथील राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) यांना संशयावरून अटक केली. तर एक विधीसंघर्षित बालक असल्याने त्याला अटक करण्यात आली नाही. या प्रकरणात तिघांकडून एलसीडी व इतर साहित्य स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. पथकाने या तिघांना शुक्रवारी (दि.२१) रात्री १ वाजतादरम्यान आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद आमगाव पोलिसांनी घेऊन हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे दिले आहे. राजकुमार धोतीच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करताना आमगावचे न्यायाधीश, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. त्यांच्या समोर कॅमेरा सुरू ठेवून तपासणी करण्यात आली.
बॉक्स
मृताच्या शरीरावर अनेक जखमा
मृत राजकुमार धोती (३०) याच्या शरीरावर विविध प्रकारच्या जखमा होत्या. पोलीस ठाण्यातून मृतदेह उचलून उत्तरीय तपासणीसाठी आमगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा व व्रण असल्यामुळे मारहाणीमुळे त्याचा मृत्यू तर झाला नाही ना अशी शंका येते. मारहाण केल्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताची बहीण हिने पोलीस ठाण्यात केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.