अस्वलाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:06 AM2017-12-03T00:06:13+5:302017-12-03T00:06:23+5:30
अस्वलाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (दि.२) गोंदिया तालुक्यातील गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी : अस्वलाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (दि.२) गोंदिया तालुक्यातील गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.
शनिवारी सकाळच्या सुमारास गंगाझरी रेल्वे स्थानकावरुन गोंदियाकडे जाणाºया डाऊन रेल्वे रुळाच्या मध्यभागी विद्युत पोल क्रमांक १०१३ जवळ अस्वल मृताअवस्थेत आढळले. त्यानंतर गंगाझरी रेल्वे स्टेशन व्यवस्थापकाने याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ब्राम्हणकर यांना दूरध्वनीवरुन दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मौका चौकशी करुन पंचनामा केला. त्यात त्या अस्वलाच्या नाकाच्या वरच्या बाजुला ताराने कापल्याचे आढळले. बाकी कुठेच जखम आढळली नसल्याचे मजितपूर येथील वन समिती अध्यक्ष नंदू आंबेडारे यांनी सांगितले.
विद्युत कंरट लावून अस्वलाची शिकार केल्याची शंका सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी नरेंद्र शेंडे यांनी व्यक्त केली. ज्या भागातून रेल्वे मार्ग जाते. त्या भागातील जंगल परिसरातील शिकारी बचावाकरिता रेल्वे मार्गावर जंगली प्राण्याचे मृतदेह टाकून रेल्वेमुळे अपघात झाल्याचे भासवितात. २०११-१२ मध्ये खरोबा टेकडी भागातील जंगल परिसरात विद्युत प्रवाह सुरु करुन एका बिबट्याची शिकार करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे रुळावर बिबट्याचा मृतदेह टाकून अपघात झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी (दि.२) अस्वलाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने तशीच शंका व्यक्त केली जात आहे. वनविभागाचे अधिकारी व स्वंयसेवी संस्थेच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत अस्वलाचे श्वविच्छेदन करण्यात आले.