गोंदियाच्या अनिकेतचा आयआयटी खरगपूरमध्ये संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:17 IST2025-04-23T16:16:45+5:302025-04-23T16:17:44+5:30
वसतिगृहात आढळला मृतदेह : कुटुंबीयांवर मोठा आघात

Suspicious death of Aniket from Gondia at IIT Kharagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील कुंभारेनगर येथील रहिवासी असलेला अनिकेत वालकर हा खरगपूर आयआयटी वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. २० एप्रिल रोजी अनिकेतचा मृतदेह तो राहत असलेल्या वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे अनिकेतच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
अनिकेत हा लहानपासूनच हुशार होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोंदियातील एका खाजगी शिकवणीतून त्याने जेईईचा अभ्यासक्रम प्रावीण्य सूचित उत्तीर्ण करून थेट आयआयटी खरगपूर गाठले होते. तेथे नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीत त्याला २४ लाखांच्या पॅकेजची नोकरी सुद्धा मिळाली होती.
सोमवारपासून (दि. २१) सुरू होणाऱ्या परीक्षेनंतर तो नोकरीवर रुजू होणार होता. पण, अचानक वालकर कुटुंबाला रविवार, दि. २० एप्रिल रोजी अनिकेतचा मृत्यू बातमी मिळाली आणि संपूर्ण वालकर कुटुंब हादरून गेले. या बातमीवर त्याच्या कुटुंबीयांचा विश्वासही बसत नव्हता. दरम्यान, गोंदिया येथील घरी असलेला मोठा भाऊ, आई आणि वहिनीने स्वतःला सावरून ही बातमी कुटुंबातील अन्य सदस्यांना सांगितली. माहिती मिळाल्यानंतर भाऊ, आतेभाऊ आणि आई अनिकेतचा मृतदेह आणण्यासाठी आयआयटी खरगपूर येथे गेले. बुधवारी (दि. २३) ते गोंदियाला येणार असल्याची माहिती अनिकेतचे काका धनंजय वालकर यांनी दिली.
मोठ्या भावासह ती भेट ठरली अखेरची
अनिकेत वालकर (२२) हा महासागर अभियांत्रिकी आणि नौदल वास्तुकला विभागातून दुहेरी पदवी घेत होता. २१ एप्रिलपासून त्याची शेवटच्या सत्राची परीक्षा सुरू होणार होती. तो एक आदर्श विद्यार्थी होता व त्याला इंटर्नशिप मिळाली होती. विशेष म्हणजे १७एप्रिलला आयआयटी-खरगपूर येथे एका फेअरवेल कार्यक्रमात त्याने आपल्या मोठ्या भावाला या कार्यक्रमासाठी बोलावले होते. त्याचा मोठा भाऊ सुदीप वालकर हा अनिकेतला भेटून शनिवारी (दि. १९) गोंदियाला परत आला.
कुटुंबीयांना संशय
अनिकेत वालकरचा मृतदेह खरगपूर येथील वसतिगृहात संशयास्पद स्थितीत आढळला. विशेष म्हणजे घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच अनिकेतचा मोठा भाऊ त्याला भेटून आला होता. तेव्हा अनिकेत कुठल्याही तणावात नव्हता. मात्र यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबीयांना सुध्दा त्याच्या मृत्यूबदल संशय आहे.
कोरोनात हरपले वडिलांचे छत्र
अनिकेतच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले. त्यामुळे आई, भाऊ आणि काका धनंजय वालकर यांच्या मार्गदर्शनात अनिकेत शिक्षण घेत होता. अनिकेतच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
खरगपूर प्रशासनाने दिली कुटुंबीयांना माहिती
वालकर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत दीपक वालकर हा आयआयटी-खरगपूर येथे चौथ्या वर्षाचा पदवीधर विद्यार्थी होता. आयआयटी-खरगपूरच्या जेसी बोस हॉल ऑफ रेसिडेन्समधील त्याच्या खोलीत रविवारी संध्याकाळी अनिकेतचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला, अशी माहिती आयआयटी-खरगपूर प्रशासनाकडून रविवारी वालकर कुटुंबीयांना देण्यात आली.