आदिवासींचे स्वाभीमान आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 12:08 AM2017-03-04T00:08:21+5:302017-03-04T00:08:21+5:30
२० फेबु्रवारीला मकरधोकडा शाळेतील ९ व्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात शुक्रवारी
१२ सुत्रीय मागण्या मंजूर : अप्पर आयुक्तांनी दिले आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश
देवरी : २० फेबु्रवारीला मकरधोकडा शाळेतील ९ व्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात शुक्रवारी (दि.३) स्वाभीमान आंदोलन करुन १२ मागण्यांचे निवेदन आदिवासी अप्पर आयुक्तांना देण्यात आले. या आंदोलनात आदिवासी विद्यार्थी व जनतेचा आक्रोश बघता मकरधोकडा आश्रमशाळा कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश आंदोलनकर्त्यांसमोर अप्पर आयुक्त माधुरी खोडे यांनी दिले व त्यानंतरच आंदोलन संपविण्यात आले.
आदिवासी संघटनेच्या आवाहनावर हजारो आदिवासी विद्यार्थी व पालक येथील आंतरराष्ट्रीय मांझी संघटना मैदानात गोळा झाले. दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. गोंड वीरांगणा चौकात मोर्चेकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर अर्धा तास चक्काजाम आंदोलन केले. पोलीसांच्या कडक बंदोबस्तामुळे आंदोलनकर्त्यांना महामार्गावरून हटविण्यात आले. त्यानंतर मोर्चा प्रकल्प कार्यालयाकडे वळला. मोर्चाचे नेतृत्व आदिवासी विद्यार्थिनींनी केले. जनतेला मार्गदर्शन करीत आदिवासी प्रशासनाला न्याय मागीतला व शेवटी २ तास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करीत चिचगड रोडवर चक्काजाम करून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
शेवटी मागण्यांचे निवेदन घेऊन शिष्टमंडळाने प्रकल्प कार्यालयात जावून आदिवासी अप्पर आयुक्त माधुरी खोडे यांची भेट घेतली. निवेदन सादर केले असता आदिवासी जनतेचा आक्रोश पाहता आदिवासी अप्पर आयुक्त खोडे यांनी कार्यालयाबाहेर येवून आंदोलनकर्त्याना संबोधीत करीत मकरधोकडा आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्यात येत असल्याचे सांगीतले. तेथील विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात येईल असेही सांगितले. त्या व्यतिरीक्त संपूर्ण १२ मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच आंदोलन समाप्त करण्यात आले. आंदोलन कर्त्यांमध्ये शासन व प्रशासनाविरूध्द तीव्र रोष दिसत होता. मोर्च्याचे नेतृत्व आदिवासी समाजातील सर्व संघटनानी केले. (प्रतिनिधी)