८६८ गावांत राबविण्यात येणार 'स्वच्छता ही सेवा'; आजपासून होणार उपक्रमाचा शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 05:14 PM2024-09-18T17:14:34+5:302024-09-18T17:18:14+5:30
Gondia : गावातील ब्लॅक स्पॉट हृद्दपार करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान जिल्हयातील ८६८ गावांमध्ये 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून गावागावांतील 'ब्लॅक स्पॉट' हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती देत सर्व ग्रामपंचायतींनी उपक्रमाला यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथम यांनी केले आहे.
वर्ष २०१७ पासून 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. त्यानुसार संपूर्ण देशात स्वच्छतेचे उपक्रम राबवून परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. यावर्षी 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' ही थीम घेऊन विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य शासनाने दिले आहेत.
स्वच्छता ही सेवा' या उपक्रमातून मुख्यतः तीन ठळक मुद्यांवर भर देण्यात आला आहे. यात स्वच्छतेची भागीदारी, संपूर्ण स्वच्छतेअंतर्गत स्वच्छतेचे लक्ष्यित गटांची स्वच्छता आणि सफाई मित्र सुरक्षा शिबिर यांचा समावेश आहे. या तीन उपक्रमाअंतर्गत तारखेनिहाय नियोजनानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यानुसारच मंगळवारी (दि.१७) उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छतेची शपथ घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बुधवारी (दि.१८) सफाई मित्र सुरक्षा शिबिर, गुरुवारी (दि.१९) 'एक दिवस श्रमदानासाठी' या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तर शुक्रवारी (दि.२०) खाऊ गल्लीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच स्वच्छतेच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम, एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती, शून्य कचरा उपक्रम, एक झाड आईच्या नावे, स्वच्छता रॅली, शाळा- महाविद्यालयांमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याची तथा स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध स्पर्धाचे आयोजन करणे, स्वच्छता संवाद आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, वारसास्थळांची स्वच्छता, वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत खड्डानिर्मिती करणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणे. स्वच्छतेची वाहने व उपकरणांची स्वच्छता करणे, १ ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा आणि २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त स्वच्छ भारत दिवस साजरा करण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत आणि गटसंसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन उपक्रम यशस्वी करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी याप्रसंगी अभियानाची संपूर्ण माहिती दिली.
महाश्रमदानात सहभागी व्हा!
स्वच्छता ही सेवा आहे. स्वच्छता असलेल्या ठिकाणात आरोग्य वास करते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने येत्या १७ तारखेपासून चालणाऱ्या 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमात सहभागी व्हावे. प्रत्येक व्यक्तीने कचरामुक्त परिसरासाठी श्रमदानातून स्वच्छता करावी. त्याची सेल्फी काढावी. १९ तारखेला संपूर्ण जिल्ह्यात महाश्रमदानाचा उपक्रम पार पडणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक केंद्रप्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटनस्थळे, रेल्वेस्थानक, धार्मिक, आध्यात्मिक स्थळे, प्राणिसंग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू वारसास्थळे, नदी किनारे, घाट, नाले अशा प्रत्येक ठिकाणात स्वच्छता मोहीम राबवावी.