स्वाध्याय माला उपक्रमात जिल्हा राज्यात टाॅप टेनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 05:00 AM2021-01-01T05:00:00+5:302021-01-01T05:00:17+5:30
विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करावे यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून सराव करण्यात येत आहे. याचा गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. हा उपक्रम व्हॉटस्ॲप बेस असून पहिली ते दहावी या वर्गासाठी या उपक्रमाची सुरुवात ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना दर शनिवारी भाषा आणि गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. मुलांनी प्रश्न सोडविल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका प्राप्त होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोनाच्या संक्रमणामुळे मागील सात आ- महिन्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून विविध ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. याच अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वाध्याय उपक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करावे यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून सराव करण्यात येत आहे. याचा गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. हा उपक्रम व्हॉटस्ॲप बेस असून पहिली ते दहावी या वर्गासाठी या उपक्रमाची सुरुवात ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना दर शनिवारी भाषा आणि गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. मुलांनी प्रश्न सोडविल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका प्राप्त होते. त्यातील कोणते प्रश्न चूक आणि बरोबर याची माहिती विद्यार्थ्यांना मिळते.
आतापर्यंत सहा स्वाध्याय झाले आहेत. एकाच मोबाईलवर अनेक विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडविता येत असल्याने ही बाब विद्यार्थ्यांसाठी सोयीची आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला राज्यात विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक ७८ हजार ३१९ विद्यार्थ्यांची नोंदणी चंद्रपूर जिल्ह्याने केली आहे.
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, काही अडचणी आल्यास त्या त्वरित सोडविता याव्यात यासाठी जिल्हा संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यासाठी रवींद्र रहमतकर यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये राज्यातील पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्हाचा समावेश असून यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, डायटचे प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
स्मार्ट फोनची समस्या नाही
ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाकडे स्मार्ट फोन नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत होते. शिवाय याचा विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवरसुद्धा परिणाम होत होता. मात्र स्वाध्याय माला उपक्रमात एकाच मोबाईलवर अनेक विद्यार्थ्यांना चाचणी देता येत असल्याने स्मार्ट फोनची समस्या नाही.
कव्हरेज अडचण तरी नो प्राब्लेम
जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा फटका बसत आहे. मात्र या अडचणीतसुद्धा जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला ही सुद्धा कौतुकाची बाब आहे.