२८ हजार क्विंटल लाकडे होळीत होणार स्वाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 10:32 PM2018-02-28T22:32:53+5:302018-02-28T22:32:53+5:30
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. एकीकडे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी धडपड सुरू असताना दुसरीकडे मात्र होळीनिमित्त २८ हजार ८०५ क्विंटल लाकडे जाळली जाणार आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या १६ पोलीस ठाण्यांतर्गत १ हजार २४० सार्वजनिक तर १०२१ खासगी होळी जाळल्या जाणार आहेत. गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक होळी १२० तर खासगी १३५, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५०, खासगी ८२, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४८ तर खासगी १०५, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७० खासगी १०५, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ६५, खासगी २०, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३० तर खासगी १५, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ८० तर खासगी ७५, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १६५ तर खासगी ६६, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ७०, खासगी ९०, सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १७०, खासगी २०, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३०, खासगी ४५, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १२५, खासगी ३०, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक २२, खासगी २९, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ४३ तर खासगी ३४, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ५७ तर खासगी १२०, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ९५ तर खासगी ५० जाळण्यात येणार आहे. प्रत्येक होळीसाठी कमित कमी चार ते पाच क्विंटल लाकडे जाळले जातील. जिल्ह्यात जाळल्या जाणाऱ्या १२४० सार्वजनिक व १०२१ खासगी होळीसाठी २७ हजार ८०५ क्विंटल लाकडे जाळले जाणार असल्याचे बोलल्या जाते.
एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आज घडीला एक क्विंटल लाकडाची किमत ८०० रुपये सांगितले जाते. या २८ हजार क्विंटल लाकडाची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव करतात. पर्यावरणाची हाणी करणाऱ्या या प्रकराला टाळण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
तंटामुक्त समित्या लक्ष ठेवणार
होळीला धार्मिक भावना दुखावल्या जातील असे पोस्टर्स, देखावे, चित्र, नाटके किंवा प्रक्षोभक घोषणा देणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना देखील करण्यात आले आहे. होळीचा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी मोहल्ला कमिटी, ग्राम सुरक्षा दल व तंटामुक्त गाव समिती, पोलीस मित्र यांच्या बैठका घेतल्या आहेत.
ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त करणार
होळीच्या सणाला समाज कंटक, समाज विघातक, मुलतत्ववादी व गुंड प्रवृत्तीचे इसम मद्यप्राशन करून अश्लिल वक्तव्य करणाºयांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. धार्मिक स्थळावर गुलाल उधळणे, मुलींची छेडखानी करणे, होळी प्रथम कुणी पेटवावे, एकमेकांच्या अंगावर गुलाल रंग, फुग्यांमध्ये पाणी भरुन मारणे, चिखल अंगावर टाकणे, ढोल-ताशे वाजवून नाचत गाजत फगवा काढणे, जुन्या वैनमस्यातून वाद निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाºयावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी तंटामुक्तीची मदत घेणार आहेत.
‘‘सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ अशा उपक्रम प्रत्येक गावात राबविला जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, वनांचे संरक्षण करून मानवाच्या उत्थानासाठी नैसर्गिक रंग खेळावा. लाकडे जाळणे टाळावे.
-एल.एस. भुते,
क्षेत्र सहाय्यक, आमगाव.