चापटीतील दारुबंदीच्या लढ्याने घेतला वेग
By Admin | Published: October 11, 2015 12:56 AM2015-10-11T00:56:56+5:302015-10-11T00:56:56+5:30
जवळच्या चापटी या गावात गेल्या अनेक दिवसांपासून दारुबंदीसाठी गावकऱ्यांचा लढा सुरू आहे.
महिला-युवकांचा सहभाग : ठरावासह समितीही गठित
बाराभाटी : जवळच्या चापटी या गावात गेल्या अनेक दिवसांपासून दारुबंदीसाठी गावकऱ्यांचा लढा सुरू आहे. ९ आॅक्टोबरला तंटामुक्त समितीच्या अनुषंगाने गावकऱ्यांनी विशेष सभा घेऊन दारुबंदीसाठी ठराव केला. यासाठी समितीही गठीत करण्यात आली. त्यामुळे हा लढा आता वेग घेत असल्याचे दिसून येते.
या सभेला जवळपास ५०० युवक, नागरिक, महिला व गावातील पदाधिकारी उपस्थित होते. सभेला पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरगावचे दोन शिपाई सुद्धा हजर होते. आतापर्यंत पोलीस शिपाई कधीच अशा सभांना येत नव्हते. या सभेत फक्त दारुबंदी या विषयावरच चर्चा घेण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत चापडी गावात दारुबंदी झालीच पाहिजे असे प्रत्येक गावकऱ्याचे स्पष्ट मत होते.
गावामध्ये गावकऱ्यांनी ६ फेब्रुवारी २०१४ या दिवशी दारु पकडून दिली होती. परंतु दारु विक्रेत्यांवर कारवाई न होता उलट दारु पिणाऱ्या इसमावर पोलिसांनी कारवाई केली, अशी उलट मदत गावकऱ्यांना पोलिसांकडून मिळण्याचा अनुभव आहे.
अशा कारणामुळे दारु विक्रेते वरचढ होऊन बोलू लागतात, असे गावकरी म्हणतात. पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरगावची मदत बरोबर मिळत नाही. गावकरी मोठ्या संख्येने सभेला हजर राहू नये म्हणून काही लोकांनी संपूर्ण गावात माहिती दिलीच नाही. तरीही मोठ्या संख्येने लोक हजर होते. गावात दारुबंदी व्हावी म्हणून ५२ नागरिकांची समिती गठित करुन बंदीबाबत ठराव लिहीण्यात आला. गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. दारु पकडून देणाऱ्याला १ हजार १ रुपये देण्यात येणार आहेत. गावामध्ये दारुबंदीचे पत्रक, नोटीस, बॅनर लावण्यात येणार आहेत. दारुबंदीसाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे सर्व पदाधिकारी आणि पोलीस विभागाचे सहकार्य लागणार आहे. गावातील स्वयंसेवकांचाही यात सहभाग राहील, यावरही चर्चा झाली. (वार्ताहर)