गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या ॲपल बोरांचा परराज्यात गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 08:00 AM2022-03-10T08:00:00+5:302022-03-10T08:00:13+5:30
Gondia News गोंदिया जिल्ह्यातील सिंदीपारच्या शेतकऱ्यांनी ॲपल बोराचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या ॲपल बोरांना काठमांडू, दिल्ली, कोलकाता, पंजाब येथे मोठी मागणी आहे.
राजकुमार भगत
गोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे, मात्र आता शेतकरी पारंपरिक पिकांना बगल देत नगदी पिके घेण्याकडे वळू लागला आहे. त्यामुळे धानाच्या शेतीसह फळबागासुद्धा जिल्ह्यात फुलू लागल्या आहेत.
तालुक्यातील ॲपल बोरांची मागणी परराज्यात वाढली असून त्याचा गोडवा वाढत असल्याने शेतकरीसुद्धा समृद्ध होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील बारमाही पीक घेणारे गाव म्हणून सिंदीपारची ओळख आहे.
येथील शेतकऱ्यांनी ॲपल बोराचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. या ॲपल बोरांना काठमांडू, दिल्ली, कोलकाता, पंजाब येथे मोठी मागणी आहे. सिंदीपार गावात ५० ते ६०च्या जवळपास कुटुंब भाजीपाला व आधुनिक विविध पिके घेतात. याच गावातील युवा शेतकरी चंद्रशेखर लंजे यांची २५ एकर शेती असून त्यांनी ७ एकरांमध्ये ग्रीन ॲपल बोर व तीन एकरात रेड (काश्मिरी) ॲपल बोराची लागवड केली.
त्यांच्या शेतात उत्पादित होणारी दहा एकरांतील ॲपल बोरे नागपूरच्या ठोक व्यापाऱ्याला विक्री करतात. व्यापारी सिंदीपारची ॲपल बोरे काठमांडू, दिल्ली, कोलकाता, पंजाब आदी ठिकाणी पाठवितात. लंजे यांनी ॲपल बोराप्रमाणेच केळी(चार एकर) , टरबूज आणि ऊस( प्रत्येकी तीन एकर),व पाच एकरांत धानाची लागवड केली आहे.
कृषी प्रदर्शनातून मिळाली प्रेरणा
शेतकरी लंजे यांना कृषीविषयक नवीन प्रयोग करण्याची आवड आहे. यासाठी ते कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेटी देतात. २०१० मध्ये कृषी विभागामार्फत जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा दौरा केला. तर गडचिरोली जिल्ह्याचा टरबूज लागवडविषयी दौरा केला. त्यांनी २०१४ मध्ये डाळिंबाचे उत्पादन घेतले. नाशिकच्या कृषी प्रदर्शनात ॲपल बोरांच्या स्टॉलची माहिती घेत ॲपल बोरांची लागवड केली.
एका एकरात १५ टन ॲपल बोरांचे उत्पादन
लंजे यांनी २०१५ पासून ॲपल बोरांची लागवड सुरू केली आहे. सरासरी एका एकरांत १५ टन ॲपल बोरांचे उत्पादन घेत आहे. त्यांनी ३० ते ३५ लोकांना रोजगार दिला आहे.
कृषीविषयक पुस्तके आणि लेखातून आपला आत्मविश्वास वाढला. त्यानंतर आपणही शेतात नवीन प्रयोग करण्याचा निर्धार करीत ॲपल बोरांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
- चंद्रशेखर लंजे, शेतकरी