लक्षणे असलेली रुग्ण ठरताहेत ‘सुपरस्प्रेडर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:26 AM2021-04-19T04:26:19+5:302021-04-19T04:26:19+5:30
गोंदिया : बदलते वातावरण यामुळे होणारे सर्दी, पडसे, ताप आणि कोविड सदृश्य रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणेही जवळपास सारखी असल्याने आधी ...
गोंदिया : बदलते वातावरण यामुळे होणारे सर्दी, पडसे, ताप आणि कोविड सदृश्य रुग्णांमध्ये आढळणारी लक्षणेही जवळपास सारखी असल्याने आधी सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे उद्धवल्यानंतर नागरिक दवाखान्यात जावून चाचणी करणे टाळत असल्याने संसर्ग वाढतोय आणि त्यानंतर दहा ते बारा दिवस अंगावर दुखणे काढून गावात व घरात संक्रमण पसरवून, नंतर चाचणी केल्यावर पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने ‘सुपरस्प्रेडर‘ ठरत आहेत.
ग्रामीण असो वा शहरी भागात प्राथमिक लक्षणे आढळली, तरी आपल्या गल्ली-बोळातील डॉक्टरकडे जाऊन तात्पुरती उपाययोजना करतात. त्यानंतर, प्रकृती बरी न झाल्यास दोन दिवसाने कोरोना चाचणी करण्यास सांगितल्यावरही नागरिक भीतिपोटी अंगावर दुखणे काढतात. त्यानंतर, जास्त वाटल्यास आरटीपीसीआर करतात. या चाचणीचा अहवाल येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी जातो. तोपर्यंत ही व्यक्ती बाहेर इतरांमध्ये मिसळणे, विलगीकृत न राहणे अशा गोष्टी करते. मग चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर घरातील इतर लोकही संक्रमित झालेली असतात आणि संपर्कात येणाऱ्या लोकांसाठीही असे व्यक्ती सुपरस्प्रेडर ठरतात.
बॉक्स
पॉझिटिव्ह व्यक्तींनी १४ दिवस विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करावा
ज्या व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह येते व त्यांना सौम्य लक्षणे असतात, अशा नागरिकांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो, परंतु ७ दिवसांनंतर पुन्हा चाचणी करून चाचणी निगेटिव्ह येताच, हे व्यक्ती विलगीकरण टाळून इतरांमध्ये मिसळतात. ती बाबही घातक ठरते. त्यामुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती आधीच कमकुवत झालेली असून, पुन्हा त्यांना संक्रमन होणार नाही, याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण सांगता येत नाही. त्यामुळे अशा नागरिकांनी बाहेर फिरण्याचा मोह टाळावा.