कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:52+5:302021-02-25T04:36:52+5:30
गोंदिया : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा ...
गोंदिया : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे,त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता यंत्रणेने सज्ज रहावे, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सर्व संबंधित विभाग व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीत खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था, व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सिलिंडरची पुरेशी व्यवस्था इत्यादीबाबत आढावा घेण्यात आला. या वेळेस शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार देण्यासाठी डॉक्टरांची व स्टाफची पर्याप्त संख्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. खासगी रुग्णालयांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तयारी करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी खवले यांनी सदर बैठकीत दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, तहसीलदार आदेश डफाळ, अनिल खळतकर उपस्थित होते.
......
नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसेल अशा संस्था, आस्थापना, दुकान,बाजार परिसर, सार्वजनिक ठिकाण, लॉन, हॉटेल, रेस्टॉरंट, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस,वाचनालय, उद्यान, स्टेडियम, क्रीडांगण इत्यादी ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांवर,सामाजिक
अंतर न ठेवणाऱ्यांवर, मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांची गर्दी करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी खवले यांनी दिले.