आमगावचे तहसील कार्यालय दुर्गंधीच्या विळख्यात
By admin | Published: July 23, 2014 12:05 AM2014-07-23T00:05:42+5:302014-07-23T00:05:42+5:30
तहसील कार्यालयात समाजातील प्रत्येक घटकाला कामानिमित्त जावे लागते. त्यात महिला, पुरूष, विद्यार्थी किंवा नोकरीत असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तींना काही ना काही काम पडतेच.
ओ.बी.डोंगरवार - आमगाव
तहसील कार्यालयात समाजातील प्रत्येक घटकाला कामानिमित्त जावे लागते. त्यात महिला, पुरूष, विद्यार्थी किंवा नोकरीत असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तींना काही ना काही काम पडतेच. पण आजघडीला प्रशासनकर्त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तहसील कार्यालयात एवढी दुर्गंधी व अस्वच्छता दिसत आहे की सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. मात्र स्वच्छतेसंदर्भात कोणतीच पावले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उचलली जाताना दिसत नाहीत.
तहसील कार्यालयतील प्रवेशव्दाराजवळ मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसत आहे. महिला व पुरुषांच्या शौचालयांची व मुतारी गृहांची वाट लागली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे की, कार्यरत कर्मचारी किंवा कामानिमित्त आलेले नागरिक लघुशंकेला जाऊ शकत नाही. उघड्यावरती महिलांना किंवा पुरुषांना आपली उपविधी आटोपावी लागते. तहसीलच्या मागे गुरांकरिता गवत खाण्याचे कुरण उगवले आहे. तेथे जनावरे फिरताना दिसतात. मागील भागात पळसाची व इतर झाडे वापली असून मोठी झालेली दिसत आहेत. तहसीलच्या मागे अधिकाऱ्यांचे दोन निवासस्थान आहेत. एका ठिकाणी नायब तहसीलदाराच्या नावाची पट्टी लागली आहे. मात्र ते तेथे वास्तव्यास नाहीत. दुसऱ्या बाजूला दिशादर्शक यंत्राचे कार्यालय आहे. चार महिन्याअगोदर सोलर सिस्टमव्दारे दिशादर्शक यंत्र या कार्यालयाच्या वर लावण्यात आले. सौरऊर्जा निर्माण करण्याचा हा मुख्य उद्देश आहे. मात्र चार लाख रूपये खर्च करून शासनाकडून चालविणारी योजना पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ज्या खोलीत बॅटऱ्या ठेवण्यात आल्या आहेत तेथे कोणी सबंधित अधिकारी जाताना दिसत नाही. तहसीलदारांचे मुक्काम नगरात भाड्याच्या घरात असल्याने त्यांना मागे काय सुरू आहे किंवा निवासस्थान कसे आहे, याकडे लक्ष देण्याकरिता अधिकाऱ्यांना वेळ नाही. दिशादर्शक यंत्राबद्दल माहिती मागितली असता सबंधित लिपीक फाईल लावून दोन-तीन दिवसात माहिती देतो, असे त्याचे उत्तर आहे. तहसील कार्यालयासमोर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यात पाय टाकून ओल्या पावलांनी कार्यालयात जावे लागते. कार्यालयासमोर पडलेल्या खड्यांत मुरूम टाकण्याची कल्पना अधिकाऱ्यांना सुचली नाही. कार्यालयात महसूलसबंधी महत्वाचे कागदपत्रे खुल्या आलमारीत ठेवले आहेत. काही वऱ्हाड्यातील आलमाऱ्यांना कुलूप न लावता तारांनी बांधल्या आहेत. विद्युतची व्यवस्था फारच गंभीर आहे. ज्या सेतुमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यासमोर विद्युतचा खुला खापरखेडा दिसतो. मात्र अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. एकंदरीत नवीन तहसील कार्यालय तयार होणार आहे, या सबबीखाली प्रशासन पूर्णपणे झोपी गेलेला आहे. नवीन वास्तू तयार होण्याकरिता विलंब होत आहे. त्यामुळे अति महत्वाच्या जनसमस्या त्यात महिला व पुरूषांचे शौचालय स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
तहसील कार्यालयाच्या दरवाजासमोर मोठ्या प्रमाणात घाण साचल्याने दुर्गंधी खूप येत आहे. त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. फक्त स्वातंत्र्य दिनानिमित्य स्वच्छता करुन परिसर स्वच्छ ठेवणे एवढीच अधिकाऱ्यांची जवाबदारी दिसते. इतर वेळेला दुर्गंधी तसेच अस्वच्छता याकडे पूर्णपणे दुुर्लक्ष झाले असून या व्यवस्थेला प्रशासनाने रामभरोसे सोडले आहे. अशाच प्रकार सुरू राहिला तर शासकीय कार्यालयांचे स्वरूप भंगारासारखेच होईल.