तहसीलदारांना महिलांचा घेराव

By admin | Published: April 4, 2016 05:05 AM2016-04-04T05:05:18+5:302016-04-04T05:05:18+5:30

महालगाव प्रकरणात न्याय द्या या मागणीसाठी महालगाव येथील महिला-पुरुषांनी शनिवारी (दि.२) दुपारी २.३०

Tahsiladars to cover women | तहसीलदारांना महिलांचा घेराव

तहसीलदारांना महिलांचा घेराव

Next

अर्जुनी-मोरगाव : महालगाव प्रकरणात न्याय द्या या मागणीसाठी महालगाव येथील महिला-पुरुषांनी शनिवारी (दि.२) दुपारी २.३० वाजता तहसीलदारांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर रविवारी (दि.३) पहाटे ३.३० च्या सुमारास नियोजन बध्द पध्दतीने पोलिसांनी तहसीलदारांची संतप्त जमावाच्या गराड्यातून सुटका केली. यात धक्काबुक्की झाल्याचे समजते.
महालगाव येथे समाजमंदीर आहे. या समाज मंदीराला लागून बांधकाम करण्यात आले. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुध्द यांच्या मूर्त्या मांडण्यात आल्या. या मूर्त्या सन्मानपूर्वक सुरक्षित ठिकाणी हलविण्यात याव्या या मागणीसाठी बुधवारपासून (दि.३०) १० गावकरी स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. यावर तालुका प्रशासनातर्फे ठोस निर्णय घेण्यात आला नाही. जे निर्णय घेतले ते उपोषणकर्त्यांना मान्य नाही.
आम्हाला न्याय द्या या मागणीला घेऊन शनिवारी (दि.२) महालगाव येथील सुमारे ५० महिलांनी दुपारी २.३० वाजता तहसीलदार डी.सी.बोंबर्डे यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तहसीलदारांना कक्षाबाहेर जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. सायंकाळ होत असताना कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. महिलांसोबत लहान मुले उपाशी असल्याने आंदोलनकर्त्यांनी स्वगावावरून स्वयंपाक करून भोजन मागविले.
रात्री १२ वाजतादरम्यान तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भोजन केले. तत्पूर्वी तहसीलदारांनी एक पत्र काढून आंदोनलकर्त्यांना दिले. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. रात्र जागून काढू मात्र तहसीलदारांनाही घरी जाऊ देणार नाही अशी भूमिका स्वीकारली. बंदोबस्तासाठी ठाणेदार सुनिल पाटील यांच्या नेतृत्वात रात्री १२ वाजता कुमक दाखल झाली. आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व भाजप पदाधिकारी नामदेव कापगते व डॉ. नाजुक कुंभरे यांना बोलविण्यात आले. ते रात्री २ वाजतादरम्यान पोहोचले. त्यांनी जमावाची समजूत घातली मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
आंदोलनकर्ते ऐकत नाही. तहसीलदारांना कक्षाबाहेर काढायचे या उद्देशाने पहाटे ३.३५ वाजता पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सुरूवात केली. जमावाचे नेतृत्व करणारे विलास मारगाये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही वार्ता आंदोलनकर्त्यांमध्ये पोहोचताच आंदोलनकर्ते त्या दिशेने वळले. नियोजनानुसार तहसीलदारांना घेऊन जाण्यासाठी आधीच वाहन तयार ठेवण्यात आले होते.
आंदोलनकर्ते मारगायेंच्या दिशेने वळले, नेमकी ही संधी साधून पोलिस तहसीलदारांना त्या वाहनाकडे धावत-धावत घेऊन गेले. वाहनात बसून पहाटे ३.४५ चे सुमारास तहसीलदार सुरक्षीत स्थळी निघून गेले. तहसीलदार निघून गेल्याचे समजताच जमावाने मारगाये यांना परत आणून द्या, अशी मागणी पोलिसांकडे केली. अगदी काही क्षणातच त्यांना परत आणण्यात आले. तत्पूर्वी रात्री १ वाजता तहसीलदारांसाठी भोजनाचा डब्बा आणण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी हा डब्बा सुध्दा हिसकावून घेतला. रविवारी गोंदियाचे उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर येथे दाखल झाले. खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, तहसीलदार डी.सी.बोंम्बर्डे, ठाणेदार नामदेव बंडगर, सपोनी. राजेश गज्जल यांनी महालगाव येथील दोन्ही बाजूच्या लोकांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र यश आले नाही. रात्री घडलेला प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांचा येथे चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)

दिशाभूल केल्याचा आरोप
४मुर्ती हलविण्यासाठी उपोषण केले जात आहे. यात उपोषणकर्ते प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाऊराव खोब्रागडे, भिमराव रामटेके व गावातील एका गटाने केला आहे. १९९६-९७ पासून गट क्रमांक १७९ मधील ०.१० हे.आर. जागा बौद्ध समाजाच्या नावे सातबारा व अतिक्रमण पंजीवर नोंद आहे. याच जागेवर दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत दलितांसाठी समाजमंदीर बांधकाम झाले. या समाजमंदिराला लागून विहार बांधण्यात आले व तेथे मुर्त्या बसविण्यात आल्या. त्यामुळे परवानगीची आवश्यकता नाही. यामागे जातीयवादी शक्तींचा हात आहे. उपोषणकर्ते चूकीची मागणी करीत असताना प्रशासन सुडबुद्धीने वागत आहे. चुकीची कारवाी झाल्यास प्रशासनाविरूद्ध आंदोलन करू असे निवेदनातून स्पष्ट केले आहे.

Web Title: Tahsiladars to cover women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.