गौण खनिज अवैध विक्री करणाऱ्या अग्रवाल ग्लोबल कंपनीवर कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 18:11 IST2024-07-12T18:11:33+5:302024-07-12T18:11:58+5:30
कृउबास सभापती यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार

Take action against Agarwal Global Company for illegal sale of secondary minerals
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : राष्ट्रीय महामार्ग ५३ वर पुलाचे काम करणाऱ्या अग्रवाल ग्लोबल कंपनीद्वारा शासकीय गौण खनिजाची रॉयल्टी न घेता रस्त्यावरील ढाबेवाल्यांना होणाऱ्या गौण खनिजाची अवैध विक्रीची चौकशी करून या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रमोद संगिडवार यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना केलेल्या तक्रारीतून केली आहे.
अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही मुरदोली येथे कार्यरत असून या कंपनीकडे राष्ट्रीय महामार्ग ५३ वर उड्डाणपूल तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मरामजोब या गावाजवळील घाटातील पहाडी तोडून रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या पहाडीतून निघणारे गौण खनिज शासकीय कामात न देता कंपनी रस्त्यावरील ढाबा चालकांना कोणतीही शासकीय रॉयल्टी न घेता परस्पर विक्री करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच कंपनीद्वारा पुराडा ते मकरधोकडा या शासकीय रस्त्यावर ओव्हरलोड वाहने चालवून शासकीय रस्त्याची दुर्दशा केली आहे. नागरिकांद्वारे वारंवार तक्रार करूनसुद्धा महसूल विभाग कंपनीवर कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे कृऊबास देवरीचे सभापती प्रमोद संगिडवार यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर व उपविभागीय अधिकारी देवरी यांना पत्र देऊन कंपनीवर कायदेशीर व दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष
उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक करताना अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक कंपनीचे सर्व टिप्पर ओव्हरलोड वाहतूक करीत आहेत. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे पुराडा ते मकरधोकडा रस्ता खराब झाला असून हा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे. शिरपूर येथे प्रादेशिक परिवहन विभागाचा तपासणी नाका आहे. परिवहन अधि- काऱ्यांसमोर कंपनीचे टिप्पर ओव्हरलोड वाहतूक करीत असतानासुद्धा कुठलीच कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.