बनावट जीएसटी प्रकरणात दोषींवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:42+5:302021-07-14T04:33:42+5:30
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील साहित्य खरेदी निविदेत रोशन शिवणकर यांनी बनावट जीएसटी प्रमाणपत्र सादर केले होते. ते ...
सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील साहित्य खरेदी निविदेत रोशन शिवणकर यांनी बनावट जीएसटी प्रमाणपत्र सादर केले होते. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे जीएसटी कार्यालयाकडून शिक्कमोर्तबसुद्धा झाले आहे. त्यामुळे शासन व ग्रामपंचायतीची दिशाभूल करणाऱ्या शिवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य हर्ष मोदी व ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवारी (दि. १२) येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
बनावट जीएसटी प्रमाणपत्र प्रकरणाला घेऊन मोदी व अन्य नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. हर्ष मोदी यांनी माहिती देताना सांगितले की, तालुक्यातील सौंदड ही सर्वांत मोठी ग्रामपंचायत असून, या ग्रामपंचायतीमधील विविध साहित्य खरेदी करण्याकरिता सन २०२०-२१ मध्ये ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्या ई-निविदांमध्ये सादर केलेल्या संपूर्ण कागदपत्रांची फेरतपासणी केली असता, सौंदड येथील जीएसटी सादर करणारे शिवणकर यांनी श्याम ट्रेडर्स व श्री श्याम ट्रेडर्स या नावाने दाखल केलेल्या फर्मचे जीएसटी प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले होते. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे जीएसटी कार्यालयाकडून शिक्कामोर्तबसुद्धा झाले. करिता शिवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मोदी यांनी केली. या प्रकरणी, शुक्रवारी (दि. ९) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले; परंतु अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.