विभाग नियंत्रक राज्य परिवहन भंडारा यांच्यावर कारवाई करा
By admin | Published: June 7, 2017 12:21 AM2017-06-07T00:21:24+5:302017-06-07T00:21:24+5:30
राज्य परिवहन महामंडळ गोंदिया आगाराद्वारे २१ जानेवारी २०१७ रोजी शाळेला कोणतीच सुट्टी नसताना सुद्धा
जैन यांची मागणी : खोटी माहिती पुरविल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : राज्य परिवहन महामंडळ गोंदिया आगाराद्वारे २१ जानेवारी २०१७ रोजी शाळेला कोणतीच सुट्टी नसताना सुद्धा मानव विकास योजनेची निळी स्कूल बस क्र.९३०८ ला शालेय फेरीत न चालविता फक्त प्रवाशांच्या वाहतूकीस चालविल्या. परंतु माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत खोटी माहिती पुरविण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नरेश जैन यांनी केली आहे.
या बाबत मानवविकास समितीचे विशेष निमंत्रीत सदस्य नरेशकुमार स्वरुपचंद जैन यांनी विभाग नियंत्रक रा.प.भंडारा यांना सदर तक्रार केली असता त्यांनी त्या तक्रारीवर कसलीही शहनिशा न करता संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षेपासून वाचविण्याकरिता व जैनच्या तक्रारीला खोटे पाडण्याकरिता सदर दिवशी सदर बस पंक्चर झाल्याची खोटी व चुकीची माहिती जैन यांना दिली. नरेश जैन यांचे कोणतेच समाधान न झाल्यामुळे माहिती अधिकार कायद्यांतर्गत सदर विषयी माहिती मागितली असता सदर बस सदर दिवशी पंक्चर बिघाडग्रस्त झाली नसल्याची माहिती जनमाहिती अधिकारी रा.प.गोंदिया यांनी जैन यांना पुरविली.
यानंतर पुन्हा जैन यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये सदर बसची जानेवारी २०१७ मध्ये आगारात व मार्गस्थ बिघाड अथवा पंक्चर बाबतची माहिती विचारली असता सदर वाहन संपूर्ण जानेवारी २०१७ मध्ये आगारात व मार्गस्थ बिघाड अथवा पंक्चर झालेले नसल्यामुळे सदर वाहनाची ब्रेक डाऊन रजिस्टरवर नोंद नाही. या प्रकारची माहिती जनमाहिती अधिकारी रा.प.गोंदिया यांनी जैन यांना पुरविली. यामुळे नरेश जैन यांना आश्चर्याचा धक्का बसला. विभाग नियंत्रक रा.प. भंडारा यांनी सदर तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीच चौकशी न करता खोटी माहिती का दिली हा शोधाचा विषय आहे. सदर चौकशी करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी जैन यांनी जिल्हा नियोजन अधिकारी जिमाविस गोंदिया, आयुक्त मानवविकास आयुक्तालय औरंगाबाद,महाव्यवस्थापक (वाहतूक) रा.प.मुंबई यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे नरेश जैन यांनी पुराव्यासह तक्रार केल्यावरही त्यांच्या तक्रारीवर दखल घेण्यात येत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.